Monday, April 28, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखपदकांची भूक वाढली पाहिजे

पदकांची भूक वाढली पाहिजे

अवाढव्य भौगोलिक प्रदेश असलेला व लोकसंख्या वाढीच्या आलेखामध्ये आघाडीवर असलेल्या भारत देशामध्ये क्रीडा क्षेत्र हे कधी काळी क्रिकेट आणि फार तर हॉकी या दोनच खेळापुरते सिमित होते. ऑलिम्पिक स्पर्धेंमध्ये पदक मिळविणे तर लांबच; परंतु ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळांडूना प्रवेशही मिळत नव्हता. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी भारतीय खेळाडूंची दमछाक होत असे. अाशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा यापुरते भारतीय खेळाडूंचे यश सिमित असायचे; परंतु गेल्या काही वर्षांत आपल्या देशातील क्रीडा क्षेत्राचे चित्र बदलू लागले आहे. विविध खेळांमध्ये आपल्या देशाचा केवळ सहभागच नाही, तर पदकतालिकेत आपल्या देशाचे अस्तित्व दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी कधी पी. व्ही. सिंधू, तर कधी सायना बॅडमिंटन स्पर्धेत आशेचा किरण दाखवू लागल्या आहेत. महिला टेनिसमध्ये सानिया मिर्झाने आपला ठसा गेल्या दशकभर उमटवला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजने भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावले आहे. सुवर्ण पदकाची तहान आपल्याला रौप्य पदकावर भागवावी लागलेली आहे. त्याला या स्पर्धेत सुवर्णवेध घेता आला नाही, मात्र त्याने कडवी झुंज देत रौप्यपदक मिळवले. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे लक्ष होते. भारताच्या एकाही अॅथलिटला गेल्या १९ वर्षांत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेचे पदक मिळवता आलेले नव्हते. २००३ सालच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीचे कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सच्या वाट्याला आलेला पदकांचा दुष्काळ नीरज चोप्रा दूर करेल, असा विश्वास होता. हा विश्वास नीरजने सार्थ ठरवत रौप्यपदक जिंकले आहे. अर्थात वाऱ्याचा अडथळा आला नसता, तर नक्कीच निरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले असते; परंतु या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत. खेळामध्ये या गोष्टी गृहीत धरूनच खेळाडूंना आपली चमकदार कामगिरी करून दाखवायची असते. नीरज चोप्राने भालाफेकीमध्ये जे करून दाखविले, त्यामुळे देशाचा नावलौकिक क्रीडा क्षेत्रात उंचावला आहे.

भारतामध्ये एकेकाळी हॉकी या खेळाला सर्वोच्च स्थान होते. हॉकी हा भारताचा खेळ म्हणून जगभरात ओळखला जात होता. ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीमध्ये हमखास पदक ठरलेले असायचे. हळूहळू या खेळातून भारताची पिछेहाट होत गेली व अन्य देशांनी हॉकी खेळामध्ये प्राबल्य दाखविण्यास सुरुवात केली. क्रिकेट हा मुळात इंग्लंडचा खेळ; परंतु या खेळाची लोकप्रियता इंग्लंडपेक्षा आपल्या भारतातच अधिक वाढीला लागली. भारतीय क्रिकेटवेडे आहेत, अशी जगभरात आपल्या देशाची प्रतिमा निर्माण झाली. क्रिकेटपटूंना अधिकाधिक मानाचे स्थान मिळून ते भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनले. क्रिकेट खेळाकडेच भारतीय व्यस्त राहिल्याने जगभरातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून भारताची ओळख निर्माण झाली. भारतामध्ये सुदैवाने सुनील गावस्कर, कपिलदेव, तेंडुलकर, वेंगसरकरपासून अलीकडच्या काळात कोहली, धोनी अशी नावाजलेल्या शेकडो खेळाडूंची फौज आपल्या देशामध्ये निर्माण झाली. आता फुटबॉल, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, टेनिस, नेमबाजी, अॅथलिट या खेळांकडेही भारतीयांची पावले मोठ्या संख्येने वळू लागली आहेत. एकेकाळी पश्चिम बंगाल व गोव्यापुरता सिमित असलेला फुटबॉल आता राज्याच्या शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये खेळला जात आहे, एकेकाळी एक खेळ, एक खेळाडू इतपतच भारताची क्रीडा क्षेत्रात ओळख होती. नेमबाजीमध्ये लिंबाराम, अंजली वेदपाठक, टेनिसमध्ये रामनाथ कृष्णन, रमेश कृष्णन, लिएंडर पेस, महेश भूपती अशी नावे ठरावीक टप्प्याने चमकत गेली. खेळाडू नावारूपाला आले, खेळ नाही. मोठ्या संख्येने विविध खेळांमध्ये खेळाडू निर्माण करता आले नाहीत, ही आजही आपल्या देशाची शोकांतिका आहे. भारताचा फुटबॉल म्हटल्यावर बायचुंग भुतियाचा अपवाद वगळल्यास आपल्याला इतर खेळाडूंची नावे आठवत नाहीत. क्रिकेट खेळ विचारल्यावर शेकडोंनी खेळाडूंची नावे व त्यांनी केलेले विक्रम आम्हा भारतीयांना तोंडपाठ आहेत. लिंबारामकडे साधे धनुष्यही नव्हते, तरीही तो खेळामध्ये चमक दाखविताना आपल्या देशाचा नावलौकिक वाढवित होता. मुळातच जगातील आकारमानाने लिंबू-टिंबू असणारे देश जागतिक स्पर्धेतील पदकतालिकेत पदकांची लयलूट करत असल्याचे पाहावयास मिळतात, आपला देश मात्र कांस्य पदकासाठी संघर्ष करताना पाहावयास मिळतो. मग आपला देश अर्थसंकल्पात क्रीडा विभागासाठी तरतूद करतो, वर्षानुवर्षे क्रीडामंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात तसेच राज्याराज्यांतील मंत्रिमंडळात पाहावयास मिळतात, त्याचा नक्की काय उपयोग होतो. केवळ खेळाडूंनी यश मिळविल्यावर अभिनंदनासाठी रांगा लावताना, शुभेच्छांचा वर्षाव करताना क्रीडा मंत्री व क्रीडा अधिकाऱ्यांच्या रांगा संबंधित खेळाडूंच्या घरी लागतात. संबंधित खेळाडूला आर्थिक मदत करताना केंद्र सरकार व स्थानिक राज्य सरकार हात आखडता घेत नाहीत; परंतु हा निधी यश मिळविल्यावर खर्च करण्याऐवजी खेळाडू घडविण्यासाठी खर्च केल्यावर, तर आपल्या भारत देशाचा क्रीडा विभागात निश्चितच दबदबा वाढेल. आपल्याकडे अभ्यासाला प्राधान्य दिले जात असल्याने बालपणापासूनच क्रीडा विभागाला कमी स्थान देण्यात आले आहे. अभ्यास सोडून मुलांनी खेळावर भर दिल्यास घरातून त्यांना ‘प्रसाद’ मिळतो. या पार्श्वभूमीवर खेळाडू काय घडणार आणि खेळ काय विकसित होणार हा संशोधनाचा विषय आहे. मुळातच केवळ एका पदकावर समाधान मानण्याची मानसिकता बदलली पाहिजे आणि आपल्या देशवासीयांची पदकाची भूक वाढली पाहिले. विविध खेळांसाठी तरतूद झाली पाहिजे. क्रीडांगणे सुस्थितीत असली पाहिजेत. इनडोअर व आऊटडोअर खेळांना प्राधान्य मिळाले पाहिजे. आपल्याकडे पावसाळ्यात पाऊस पडल्यास तब्बल पाच महिने क्रीडांगणाची वाताहत झालेली असते. या क्रीडांगणाची डागडुजी करायला दोन महिने जातात. अशा देशामध्ये वर्षातील पाच महिने क्रीडांगणे उपलब्ध होत असतील, तर त्या देशामुळे काय खेळाडू घडणार, काय पदके मिळणार. खेळाडू घडविण्यासाठी बालवयापासूनच सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पदतालिकेत केवळ एका पदकावर समाधान मानण्याचे चित्र आता बदलले पाहिजे. पदतालिकेत आपले अस्तित्व नाही तर प्रभुत्व निर्माण झाले पाहिजे. एका खेळाडूला नाही तर अनेकांना पदके मिळाली पाहिजेत. आपली खेळाप्रतीची मानसिकता अगोदर बदलली पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -