नवी दिल्ली : सुवर्णपदक जिंकणारा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीमुळे बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
बर्मिंगहॅम येथे येत्या २८ जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, स्पर्धा सुरु होण्यास अवघ्या ४८ तासांचाच अवधी बाकी असताना नीरजने माघार घेतली. नीरज दुखापतीमुळे बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर झाला आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी याबाबत माहिती दिली आहे.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने १८ व्या जागतिक एथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावले. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, या स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाल्याने त्याला महिनाभर मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.