मुंबई : उद्धव खोटारडा, दुष्ट, कपटी आणि कारस्थानी आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर मराठी माणसाची आठवण झाली. मी त्यांना गेल्या ४० वर्षांपासून ओळखत असून त्यांच्या अंगात दृष्टपणा आणि कपटीपणा भरलेला आहे. सत्तेतील अडीत वर्षात ठाकरेंनी कोणतेच काम केलेले नसून, आजरपण आणि मातोश्री या दोन्हीमध्येच त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ गेला, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले.
मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या. ज्यांना त्यांनी सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितले, असा गौप्यस्फोटही यावेळी त्यांनी केला. नक्षलवाद्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मारायची सुपारी दिली होती. रमेश मोरे ची हत्या कुणी केली? माझी पण सुपारी दिली होती, पण मी सुदैवाने वाचलो, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर अनेक नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी २००५ मध्ये ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी मला संपवण्यासाठी अनेकांना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या. यामध्ये देशातल्या आणि देशाबाहेरील गँगस्टर्सचा समावेश होता. मात्र, मी त्यावेळी यावर काहीच बोललो नाही. कारण या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ होतो. या सर्व परिस्थीतीत वाचलो तो केवळ माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे वाचलो असे म्हणत ज्यांना सुपाऱ्या दिल्या त्या व्यक्तीदेखील माझ्याशी योऊन बोलल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे.
आज सामनामध्ये प्रकाशित झालेली ठाकरेंची मुलाखत ही ठरवलेल्या प्रश्नांवर होती असा आरोपही नारायण राणेंनी यावेळी बोलताना केला.
ठाकरेंना पदावरून पायउतार केल्यानंतर संजय राऊत मनातून खूश असून, ठाकरेंची मुलाखत म्हणजे राऊतांनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. संजय राऊत म्हणजे बनावट पत्रकार असून, त्याची लायकी नाही, त्याला काही दर्जा नसल्याचा घणाघातही राणे यांनी केला आहे. राऊत उद्धव ठाकरेंना त्यांच्या तालावर नाचवत असल्याचेही राणे म्हणाले. शिवसेनेचा वारसा रक्ताने नाहीतर विचाराने चालत असतो. शिवसेनेत असताना आईवडिलांचं ऐकलं नाही अन् आता काय म्हणता शिवसेना आमची आहे? उद्धव ठाकरेंनी प्रेम, विश्वास दिला नाही, तो एकनाथ शिंदेंनी दिला. खरं तर संजय राऊतांनी शिवसेना फोडली असून, या कामगिरीनंतर राऊत मनातून खूश आहेत असेही राणे यांनी म्हटले आहे. आजारपण आणि मातोश्री यातच मुख्यमंत्री पदाची कारकीर्द गेली. आता स्वतःचं पद एकनाथ शिंदे यांना मिळालं याच्या पोटशुळातून त्यांनी मुलाखत दिली, असे राणे म्हणाले. आता संजय राऊत मनातून खुश आहे. माझ्या गुरूंनी, शरद पवारांनी सोपवलेलं काम फत्ते केलं, अशी टीका राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
वारसा रक्ताने नव्हे विचाराने मिळतो. शिवसेनेत असताना आई-वडिलांचं ऐकलं नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचं ऐकलं, असं उत्तर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत हिंमत असेल तर आपल्या आई वडिलांचे फोटो वापरा, माझ्या वडिलांचा फोटो का वापरता? असा सवाल बंडखोरांना केला होता. यावर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शिवाय, अडीच वर्षात काय केलं? तेव्हा मराठी माणूस, हिंदुत्व आठवलं नाही का? असा सवाल केला.