Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीसीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली

सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात हार्बर मार्गावरील लोकल रेल्वेचा एक डबा घसरला आहे. पनवेल लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

सीएसएमटी स्थानकात केवळ २ प्लॅटफॉर्म हार्बर मार्गासाठी आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्याने एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल गाड्यांच्या खोळंबा होऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर होती. तिला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर लोकल पुढे जाण्याऐवजी ती लोकल मागे आली आणि बफरला धडकली. यामध्ये कोणलाही दुखापत झालेली नाही. यामध्ये लोकलचा मागून चौथा कोच रुळावरुन घसरला आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.”

“सीएसएमटीवर हार्बर मार्गासाठी दोन प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्म एक हा लोकलचा कोच पुन्हा रुळावर येईपर्यंत बंद राहणार आहे. तर प्लॅटफॉर्म नंबर दोनवरुन वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र काही काळ हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार आहे. हार्बर मार्गावरील लोकलची संख्या काही काळासाठी कमी करण्यात आली आहे. सीएसएमटीला येणाऱ्या काही लोकल वडाळा स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. तर काही लोकल वडाळ्यावरुन सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटीवरुन गोरेगावला जाणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.”, अशी माहिती सुतार यांनी दिली.

मध्य रेल्वे कर्जत, कल्याण, कसारा सुरळीत सुरु असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात झालेल्या अपघाताचा या मार्गावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहितीही रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -