उल्हासनगर (प्रतिनिधी) : भाचीच्या वाढदिवसाला आलेल्या मामाने तीन सहकाऱ्यांच्या मदतीने तीन दिवसांत सहा घरफोड्या केल्या. पोलीस शिपाई बाबू जाधव यांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नेवाळी गावातील चाळीतून चारजणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा घरफोडींत चोरी केलेले साडेबारा लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.
मूळचा नांदेडचा असलेला राजू मिरे हा नेवाळी येथे बहिणीच्या घरी आला होता. तिथे त्याने त्याचा सहकारी परमेश्वर गायकवाड, प्रकाश पवार आणि एका अल्पवयीन सहकाऱ्यांच्या मदतीने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केली. अवघ्या तीन दिवसांत सहा घरफोड्या झाल्याने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक आयुक्त जगदीश सातव, मोतीचंद राठोड यांनी स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींना गजाआड करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार हिल लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी तपासाचे आदेश दिले. संबंधित आरोपी हे वडारी समाजाचे असून नेवाळी गावात राहत असल्याची गुप्त माहिती बाबू जाधव यांना मिळाली. माहिती तपासल्यानंतर पोलीस पथकाने नेवाळी गावातील चाळीत धाड टाकून चारजणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली. ते चोरी करण्यासाठी दिवसा फिरून घर निवडायचे, त्यानंतर रात्रीच्या वेळी चोरी करायचे. तसेच चोरलेल्या सोन्याच्या वस्तू विरघळवून लगड बनवायचे, हे काम करणारा सोनार आणि एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले.