Friday, January 17, 2025
Homeकोकणरत्नागिरीकांदळवन उपजीविका योजनेतून जिल्ह्यातील १८ गावांत रोजगार

कांदळवन उपजीविका योजनेतून जिल्ह्यातील १८ गावांत रोजगार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना समुद्रकिनारपट्टी भागातील बचतगटांसाठी रोजगार निर्मितीचे साधन बनले आहे. पाच जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपजीविका प्रकल्पातून २८९ बचतगटांनी जून महिन्याअखेर ७१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १८ गावांमध्ये सुमारे ४४ बचतगटांनी ८ लाख ९० हजार २१९ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

कोकण किनारपट्टीवर व खाडीकिनाऱ्यावर हजारो हेक्टर कांदळवनाचे क्षेत्र आहे. त्सुनामीच्या वेळी कांदळवनाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर याच्या संवर्धनावर अधिक लक्ष केंद्रीत जात आहे. राज्यामध्येही कांदळवन संरक्षणाच्या दृष्टीने मागील काही वर्षांपासून वन विभागाच्या माध्यमातून कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेंतर्गत किनारपट्टीवर काम सुरू आहे. मागील पाच वर्षांपासून सुरू झालेल्या योजनेच्या अंमलबजावणीकरिता गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.

सामूहिक गटांमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना ९० टक्के, वैयक्तिक प्रकल्पांना ७५ टक्के अनुदान दिले जात आहे. सन २०१७ ते जून २०२२ या कालावधीत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील १२२ गावे योजनेच्या अंमलबजावणीकरीता निवडण्यात आली आहेत. खेकडा पालन, पिंजऱ्यातील मत्स्यपालन, गोड्या, खाऱ्या पाण्यातील शोभिवंत मत्स्यपालन, कालवे पालन, शिंदाणे पालन, निसर्ग पर्यटन यांसारखे उपक्रम योजनेंतर्गत राबविले जात आहेत. पहिल्या वर्षी पाच सागरी जिल्ह्यातून विविध प्रकल्पांतून ५७ लाख २८ हजार १२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले. ३५५७ ग्रामस्थांनी यात थेट सहभाग नोंदविला.

सर्वाधिक उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याने ३८ लाख ४१ हजार ६०८ रुपयांचे मिळवले. रत्नागिरी जिल्ह्याने ७ लाख ९६ हजार ६५२ रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. सन २०२२-२३ या वर्षी विविध उपजीविका प्रकल्पातून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा ७१ लाख रुपयांवर गेला आहे. ८ महिने बचतगटांना अथक परिश्रम घ्यावे लागतात. मासे, खेकडे, कालवे, शिंपले यांचे संवर्धन केले जाते. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कांदळवन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -