नवी दिल्ली (हिं.स.) : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने संरक्षण दलांसाठी २८ हजार ७३२ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीस मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेतील झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आलीय. त्यानुसार सशस्त्र ड्रोन, कार्बाइन आणि बुलेटप्रूफ जॅकेटच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आधुनिक युद्धात भारतीय सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी डीएसी द्वारे स्वायत्त पाळत ठेवण्यासाठी आणि सशस्त्र ड्रोनच्या स्वार्म्सच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी १४ जलद गस्ती जहाजे घेण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रस्तावालाही डीएसीने मंजुरी दिली आहे. यासोबतच नौदलाच्या १२५० किलोवॅट क्षमतेच्या मरीन गॅस टर्बाइन जनरेटरच्या अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे.
चीनशी असलेल्या ‘लाईन ऑफ ऍच्युअल कंट्रोल’ (एलएसी) आणि पूर्व सीमेवर पारंपारिक, हायब्रीड युद्ध आणि आतंकवाद विरोधी कारवायांसाठी शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच सैन्यासाठी ४ लाख क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स मंजूर करण्यात आल्या आहेत.