
रत्नागिरी (हिं.स.) : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते (ता. खेड) घाटात दुचाकीस्वार आणि मोटारीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि दरीच्या बाजूला उलटला. सुदैवाने चालक या अपघातातून बचावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोटे येथील एका ट्रान्सपोर्ट कम्पनीचा कंटेनर चिपळूण येथे माल भरून मुंबईकडे जायला निघाला होता. हा कंटेनर सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास भोस्ते घाट उतरत असताना रस्त्यातील स्पीड ब्रेकरजवळ पुढे असलेल्या कारचालकाने अचानक ब्रेक लावला. त्याच वेळी स्पीड ब्रेकवर दुचाकीस्वार आला. या दोघांनाही वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि कंटेनर रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडला.
सुदैवाने कंटेनर दरीवर थांबला. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. महामार्गावरील स्पीड ब्रेकर्समुळेच अपघात होऊ लागले असल्याने ते त्वरित हटवावेत, अशी मागणी होत आहे.