जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे पाटलीपुत्र एक्सप्रेसला मोठा अपघात टळला आहे. धावत्या एक्सप्रेसचे इंजिन आणि डबे वेगवेगळे झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, गाडी धावत असतानाच ही घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (गाडी नंबर १२१४१) ही मुंबईहून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी गावाजवळ रेल्वेचे अर्धे डब्बे इंजिनसह पुढे निघून गेले तर रेल्वेचे अर्धे डब्बे मागेच राहिले. डब्ब्यांचे कपलिंग सुटल्याने अर्धी ट्रेन मागे राहिली. मात्र वेळीच ही चूक लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डबे सोडून पुढे गेलेले इंजिन परत मागे आणण्यात आणि ते पुन्हा वेगळे झालेल्या डब्यांना जोडण्यात आले.
पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेच्या इंजिनला सर्व डबे जोडून झाल्यानंतर मात्र ही रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेनंतर एक्सप्रेस मधील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. प्रसंगावधान राखून सर्व नागरिक गाडीतून बाहेर पडले. दरम्यान, घटनेतील प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी रेल्वेची पाहणी करुन घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.