डॉ. उदय निरगुडकर
मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग असल्यामुळे सेलिब्रिटिजना प्रचंड मोठ्या रकमा देऊन जाहिरातीसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून करारबद्ध केलं जातं. अशा वेळी जाहिरातीतल्या प्रॉडक्टच्या उपयुक्ततेच्या दाव्यांबद्दल त्यांना जबाबदार धरावं का, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘अॅडेक्स इंडिया’च्या ताज्या अहवालानुसार ब्रॅण्ड अॅम्बेसिडरच्या मानधनात आणि जाहिरातींमध्ये प्रचंड वाढ होत आहे. या अानुषंगाने अनेक प्रश्न पुढे आले आहेत. त्यांचा वेध.
जाहिरातींची एक दुनिया आहे. या दुनियेची स्वत:ची अशी एक व्यवस्था आहे. त्यात जाहिरातदार आहेत, जाहिरात कंपन्या आहेत, माध्यमं आहेत, जाहिरात तयार करणारे कलाकार आहेत आणि जाहिरातीत काम करणारे ब्रॅण्ड अॅम्बेसिडरही आहेत. असा हा मोठा पसारा आहे. एक प्रकारे ही नवनिर्मितीच म्हणायला हवी. म्हणूनच जाहिरातीला ६५वी कला म्हणतात. त्यात दर वर्षी अब्जावधींची उलाढाल होत असते. उत्तम जाहिरात मिळाली की स्टारदेखील रातोरात सेलिब्रेटी बनतात आणि केवळ जाहिरातीवर करोडोंची कमाई करतात. एक चित्रपट हिट झाला की, आमच्या प्रॉडक्टची जाहिरात करा म्हणून ब्रॅण्ड मॅनेजर्सची रांग दारी लागते. एक आयपीएल सिझन चांगला गेला की, तशीच रांग एखाद्या सामान्य क्रिकेटपटूच्या घरीही लागते. या सगळ्यामुळे काही क्रिकेटपटूंची जाहिरातीतून वर्षाला होणारी कमाई १०० कोटी रुपयांच्या वर गेली आहे. साधं एखाद्या समारंभाला उपस्थित रहायचं, उद्घाटनाच्या फिती कापायच्या, एखाद्या प्रॉडक्टची भलामण करणारा ट्वीट करायचा किंवा एखाद्या प्रॉडक्टला नुसत ‘लाइक’ करायचं तरी त्यासाठी जाहिरात कंपन्या सेलिब्रिटींना लाखो रुपये द्यायला तयार असतात.
वीस वर्षांपूर्वी मी एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ट्रेनिंग कंपनीचा प्रमुख होतो. आमच्या स्पर्धक कंपनीने त्यावेळी प्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनवलं. अर्थात त्या जाहिराती बाहेर येण्याअगोदरच ही बातमी मला कळली होती. आता बुद्धिबळापेक्षा अनेक पटींनी लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेटमधला खेळाडू ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून नेमावा यासाठी आम्ही जवागल श्रीनाथ या जलदगती गोलंदाजाची निवड केली. यामागील आणखी एक कारण म्हणजे श्रीनाथ शिक्षणाने सॉफ्टवेअर इंजिनीअरदेखील होता. भरपूर खर्च करून त्याला आम्ही वर्षा-दोन वर्षासाठी करारबद्धदेखील केलं. पुढे महिन्याभरातच एका आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याचा खांदा निखळला आणि पुढे तो आठ-नऊ महिने खेळूच शकला नाही. जलदगती गोलंदाजांमध्ये दुखापती या पाचवीला पुजलेल्या असतात. त्याची जागा दुसऱ्या जलदगती गोलंदाजाने घेतली आणि श्रीनाथभोवतीचं प्रसिद्धीचं वलय काहीसं कमी झालं. तिकडे स्पर्धक कंपनीने विश्वनाथन आनंद यांना करारबद्ध करायला आणि त्याला आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर हा किताब मिळायला एक गाठ आली आणि प्रत्युत्तर देण्याचा आमचा डाव फसला. असंच एकदा बंगळूरुच्या कार्यालयात मी मीटिंगमध्ये व्यस्त असताना माझ्यापेक्षा दोन-पाच वर्षांनी लहान असणारा एक तरुण मुलगा बराच वेळ वाट बघत बसला होता. तो कर्नाटकाकडून रणजी ट्रॉफी उत्तम खेळायचा. भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तो फलंदाज म्हणून कसोटी क्रिकेट संघाची दारं ठोठावत होता. मी त्याची भेट घेतली. अर्थात श्रीनाथचा अनुभव असल्यामुळे मी काही त्या खेळाडूला करारबद्ध काही केलं नाही. त्यावेळी त्याला प्रमोट करणारी ब्रॅण्ड कंपनी काकुळतीला आली होती. पण मी बधलो नाही. हा खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून पुढे भारतीय क्रिकेटचा आधार बनलेला राहुल द्रविड होता. इथेही अंदाज चुकला!
असो, आजचा विषय जाहिरात युगाची स्पर्धा हा नाही, तर जाहिरातीचा परिणाम करणाऱ्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर्सची नेमकी जबाबदारी काय, हा आहे. सेलिब्रिटिजना खूप मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग असतं. म्हणूनच त्यांना प्रचंड मोठ्या रकमा देऊन करारबद्ध केलं जातं. मग जाहिरातीत केल्या जाणाऱ्या संबंधित प्रॉडक्टच्या उपयुक्ततेच्या दाव्यांसाठी त्यांना जबाबदार धरावं का, असा प्रश्न उपस्थित होतो. हे सगळं मांडत असतानाच अॅडेक्स इंडिया या संस्थेचा एक अहवाल समोर आला. त्या अहवालातली आकडेवारी स्पष्ट आहे. ती म्हणजे २०२१ मध्ये ब्रॅण्ड अॅम्बेसिडरच्या मानधनात आणि जाहिरातीत चमकण्याच्या प्रमाणात २०२० च्या तुलनेत ४४ टक्क्यांची वाढ झाली. जाहिरातविश्वात या आनुषंगाने अनेक प्रश्न चर्चेला आले आहेत.
जाहिरात कंपन्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर्सना का बरं करारबद्ध करत असाव्यात? पहिलं कारण त्या ब्रॅण्डच्या इमेजबरोबर खेळाडूची प्रतिमा मिळतीजुळती असणं. त्या जाहिरातीमधून पोहोचवायच्या संदेशाशी त्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडरचं व्यक्तिमत्त्व मिळतंजुळतं असतं, हे दुसरं कारण. तिसरं म्हणजे तुमच्याजवळ जाहिरातीची एखादी अस्सल उत्तम कल्पना नसते, त्यावेळी तुम्ही सरळसोपा मार्ग स्वीकारता. तो म्हणजे ब्रॅण्ड अॅम्बेसिडरचा. चौथं कारण म्हणजे आपला देश ‘हीरो वर्शिप’ अर्थात उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या वृत्तीवर चालतो. इथे क्रिकेट, सिनेमा यातले स्टार त्या प्रॉडक्टला एक प्रकारची विश्वासार्हता प्रदान करतात. ग्राहकांबरोबर त्यांचं एक प्रकारचं नातंदेखील असतं.
अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या जाहिराती करण्यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अतिरंजीत, अवास्तव आणि खोट्या माहितीवर आधारलेल्या जाहिरातींवर कडक निर्बंध आले आहेत. अनेक सेलिब्रिटीज जाहिरातीत काम करण्याअगोदर त्या कंपनीची आणि प्रॉडक्टची, त्याच्या विश्वासार्हतेची, जाहिरातीतल्या दाव्यांची कठोर चिकित्सा करतात. त्यासाठी कायदेतज्ज्ञांचा ताफा बाळगतात. पण असे थोडेच. बहुतांश सेलिब्रिटीज या कशाचाही विचार न करता जाहिरात करून मोकळे होतात. अशा जाहिरातीतले दावे खोटे ठरले, तर एक पेनल्टी रक्कमदेखील ठोकली जाते. पण जाहिरात केल्याने पाच कोटी रुपये मिळणार असतील, तर पाच लाख रुपयांच्या पेनल्टीची काय तमा, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी दुसरा कडक उपाय हवा, असा विचार आता बळावू लागला आहे. अशा प्रकरणांमध्ये क्रिमिनल स्वरूपाचा दावा भरला जावा की दिवाणी खटला, याबद्दल वकिलांमध्ये दुमत आहे. त्यात भर ‘सरोगेट जाहिरातीची’. म्हणजे इलायचीची जाहिरात करायची पण ब्रॅण्डचं नाव जीवघेण्या गुटख्याचं. अनेकजण माहीत असूनही अशा जाहिराती करतात. पुढे बोंबाबोंब झाली, तर माफी मागूनही मोकळे होतात. पण जाहिराती मात्र चालूच राहतात. आमच्याकडे तांत्रिक ज्ञान नाही, आम्ही हा दावा खरा की खोटा, हानीकारक आहे की नाही? हे कसं ओळखणार, अशी मखलाशी अनेकजण करतात. पण या नव्या कडक निर्बंधांमुळे त्यांना आता असं करता येणार नाही. अशा सेलिब्रेटीजना काही प्रॉडक्टस्च्या जाहिराती करण्यापासून वंचित ठेवण्याचादेखील विचार झाला. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेला धक्का पोहोचेल आणि खबरदारी म्हणून ते अशा अवास्तव जाहिराती करणार नाहीत, असा दावा मांडला गेला.
आपल्याकडे ग्राहक संरक्षण कायदा आहे. त्याच्या कलम २१ मध्ये पुरेशा तरतुदी असताना हे नवीन निर्बंध कशासाठी, असा तर्क मांडण्यात आला आहे. या प्रोडक्टमुळे उंची वाढते, त्वचा गोरी होते, याच्या सेवनाने तुम्ही बुद्धिवान बनता असे दावे करणाऱ्या जाहिराती करताना सेलिब्रिटीजना अधिक काळजी घ्यावी लागणार; परंतु काही जाहिरातींमध्ये अमुक एक प्रॉडक्ट घ्या आणि सुखासमाधानाने जगा, असं नेमकेपणाने तपासता न येणारा दावा केलेला असतो. मग तिथे हे कडक निर्बंध कसे लावणार, असाही प्रश्न समोर आला आहे. दारूची जाहिरात करण्यासाठी पाणी आणि तंबाखूची जाहिरात करण्यासाठी इलायची हे सगळं करताना आता पूर्वीसारखं बेदरकार राहता येणार नाही. म्हणूनच अनेक सेलिब्रिटी त्यांच्या जाहिरात कंत्राटात ‘यातून कोणतेही कायदेशीर झंझट उद्भवल्यास आम्ही जबाबदार नाही’, असं कलम घालण्याविषयी आग्रही असतात. अर्थात असं कलम घातल्यामुळे जाहिरात आपल्या स्पर्धक स्टारकडे जाणार अशी धाकधूक त्यांच्या मनात असते देखील. पण या सर्व प्रकारांमुळे आता अधिक सावधानता बाळगली जात आहे, एवढं मात्र निश्चित. काही महिन्यांपूर्वी लोकसभेत खोटा दावा करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात २०१७ ते २०२० या तीन वर्षांच्या काळात तब्बल १२ हजारांहून अधिक तक्रारी आल्याचं मंत्रीमहोदयांनी नमूद केलं होतं. त्यावरून याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात यावं. तेव्हा अशा जाहिराती बनवण्यापासून सावधान, त्या जाहिरातीसाठी स्वत:चं नाव वापरू देण्यापासून सावधान आणि अशा जाहिरातीतून समोर आलेल्या प्रॉडक्टचं सेवन करण्यापासून ग्राहकांनो सावधान…