नवी दिल्ली : शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला असून शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. या लढ्यादरम्यान खरी शिवसेना ओळखण्यासाठी निवडणूक आयोगात सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी शिवसेनेवरील दाव्यासंदर्भातील कागदपत्रे ८ ऑगस्टपर्यंत दाखल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशालाच उद्धव ठाकरे यांच्या गटाने आव्हान दिले आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षांतर्गत सुरू असलेल्या विरोधाची कारणे लेखी देण्यास सांगितले आहे. अशावेळी निवडणूक आयोगाचा हा आदेश असंवैधानिक आणि घाईघाईने घेतलेला निर्णय असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे. ठाकरे गटाचे शिवसेना सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे. यात शिंदे गट खोटे बहुमत दाखवत संघटनेवर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.