Thursday, July 18, 2024
Homeदेशहिंदू वेशात आलेल्या २ मुस्लीम तरुणांकडून ३ दर्ग्यांमध्ये तोडफोड

हिंदू वेशात आलेल्या २ मुस्लीम तरुणांकडून ३ दर्ग्यांमध्ये तोडफोड

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सख्ख्या मुस्लीम भावांनी तीन दर्ग्यांवर गोंधळ घातला. त्यांनी कबरीवरील चादरी आणि पडदे जाळले. यादरम्यान वातावरण चिघळण्यापासून थोडक्यात वाचले. हे दोघे भाऊ पकडले गेले नसते तर जिल्ह्यात वणवा पेटला असता आणि स्थिती वेगळी असती, हे निश्चित. या प्रकरणात कमल आणि आदिल या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्ह्याचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि पोलीस अधिक्षक परिसरात तळ ठोकून आहेत.

जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे, ज्यात दोन मुस्लीम बांधवांनी तीन धर्मस्थळांवर गोंधळ घातला. जिल्ह्यातील वातावरण खराब करण्यासाठी त्यांनी हे सर्व केले. कमल आणि आदिल या दोन सख्ख्या भावांनी तीन ठिकाणी दर्ग्यात जात मजारचे नुकसान केले. त्यांनी याठिकाणची चादर आणि पडदे जाळून राख केले.

परिसरातील लोकांनी हे सगळे पाहिले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कमल आणि आदिल या दोन्ही भावांना अटक केली. घटनेची माहिती मिळताच डीएम उमेश मिश्रा आणि एसपी दिनेश सिंह यांनी घटनेचा आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस दोन्ही भावांची कसून चौकशी करत आहेत. या तोडफोडीमागील नेमकी कारणं काय याचा शोध पोलीस चौकशीत घेत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले, “शेरकोट पोलिसांनी मोठी घटना घडण्यापासून रोखली. पोलिसांना ही माहिती पाच वाजण्याच्या सुमारास मिळाली की जलाल शाह मजारवर तोडफोड करून चादरी जाळण्यात आल्या आहेत. यावर कडक कारवाई करत पोलीस तपास करेपर्यंत त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुरेशहा मजारवर तोडफोड झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे पोहोचून तिथेही कारवाई केली.

पोलिसांनी सांगितले की, कमल आणि आदिल अशी या दोन व्यक्तींची नावे आहेत. हे दोघे सख्खे भाऊ आहेत. या दोघांनी डोक्यावर भगव्या रंगाचा पट्टा बांधला होता आणि त्यांनी ही तोडफोड केली. कावड यात्रेदरम्यान हे सर्व घडवून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली. सध्या या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -