
मुंबई : मुंबईतील गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाकाला जोडणारा आरे कॉलनीमधला मुख्य मार्ग मुंबई पोलिसांनी पूर्ण बंद केला आहे. गोरेगाव चेक नाक्यावर आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी २४ तासांसाठी बंद असणार आहे.
https://twitter.com/MTPHereToHelp/status/1551424319557107712मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याचे कारण मुंबई वाहतूक पोलिसांनी दिले आहे. आरे मेट्रो कारशेडच्या कामासाठी झाडे तोडली जात असल्याचा संशय पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
हा मार्ग बंद असल्याने आरे मार्गे पवईला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्याच्या परिणामी आता पवईला जाण्यासाठी जेव्हीआरएल मार्गावरून जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरे कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आरे कॉलनीतील मार्ग वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
पर्यावरणप्रेमींना पोलिसांच्या नोटिसा
मुंबईतील आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात येत असल्याचे समोर आले आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर पर्यावरणप्रेमींकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीद्वारे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
https://twitter.com/junglee999/status/1551425454841548800 https://twitter.com/kaynair/status/1551430600464093186