Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात ‘स्वाईन फ्ल्यू’ने वाढवली चिंता; जुलैमध्ये तिघांचा मृत्यू

ठाण्यात ‘स्वाईन फ्ल्यू’ने वाढवली चिंता; जुलैमध्ये तिघांचा मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असताना ‘स्वाईन फ्ल्यू’ने ठाण्यात डोके वर काढल्याचे चित्र आहे. ठाण्यात जुलै महिन्यात २० स्वाईनचे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत त्यापैकी दोन महिलांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ठाणे शहरात रहाणाऱ्या एका ६० वर्षाच्या इसमाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

ठाण्याच्या बी कॅबिन परिसरात रहाणारे ६० वर्षाचे नागरिक शनिवारी सकाळी स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने संध्याकाळी त्यांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, त्यांना मुंबईला घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे ठाण्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान, स्वाईन फ्लूने रुग्ण दगावल्याने शहारत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे ११ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईनंतर आता ठाणेकरांचीही चिंता वाढली आहे.

ठाण्यात एकट्या जुलै महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे २० रुग्ण आढळून आले असून, यातील १५ जण उपचार घेऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे; तर ३ रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी २ रुग्ण हे ठाणे हेल्थ केअरमध्ये उपचार घेत असून, एक रुग्ण ज्युपिटर रुग्णालयात दाखल आहे. स्वाईनने मृत झालेल्या दोनपैकी एक महिला ७१ वर्षे, तर दुसऱ्या महिलेचे वय ५१ आहे. यातील पहिली महिला शहरातील जितो रुग्णालयात १४ जुलैला उपचारासाठी दाखल झाली होती. १९ जुलैला त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला; तर दुसरी महिला १४ जुलैला ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली, त्यांचा १८ जुलैला मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल २० रुग्ण आढळले आहेत. शहरात सर्व्हे करण्याचे काम आरोग्य यंत्रणेने सूरु केले आहे.ठाण्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात औषध फवारणी व उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

डेंग्यू , मलेरियाही फोफावतोय…

ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूसोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण देखील वाढले असून, डेंग्यूचे ८ तर मलेरियाचे १४ रुग्ण आढळले आहेत. पालिका प्रशासनाने आतापर्यंत ६०० नागरिकांच्या घरात जाऊन ताप आणि स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आहेत की नाही याची तपासणी केली आहे. यामध्ये अजूनही कोणाला लक्षणे आढळली नसली तरी प्रशासनाकडून योग्य ती सतर्कता बाळगण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -