Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

शरद पवारांचे राजकारण खालच्या पातळीचे

शरद पवारांचे राजकारण खालच्या पातळीचे

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास लेखनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. पुरंदरे यांनी त्यांच्या लेखनात महाराजांवर जेवढा अन्याय केला, तेवढा अन्याय अन्य कोणत्याही लेखकाने केला नसल्याचा आरोप केल्यानंतर पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ब्राह्मण महासंघाकडून पवारांवर टीका करण्यात अाली. दरम्यान भाजपचे नेते आणि प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे यांनी शरद पवार यांच्यावर ‘पवार साहेबांचे राजकारण किती खालच्या पातळीचे असू शकते याचा हा धडधडीत पुरावा’, असे म्हणत एक अभिप्रायाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. राणे यांनी पुढे म्हटले आहे की, ‘१६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचे कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचे लिखाण चुकीचे वाटू लागले आहे. याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत’.

तसेच निलेश राणेंनी पोस्ट केलेल्या कथित अभिप्रायच्या फोटोमध्ये, ‘बाबासाहेब पुरंदरे यांच्या भगिरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली. महारांजाच्याबद्दल अपूर्व आत्मीयता, अभिमान ही शिवशाहिरांची प्रेरणा असल्याने शिवसृष्टी जिवंत वाटते. राज्याभिषेकाचे दृष्य अतिशय प्रेरणादायक व उत्कृष्ट आहे. यानिमित्ताने प्रखर, राष्ट्रभक्ती, अपार मातृप्रेम, स्वच्छ चरित्र्य या महाराजांच्या खास गुणांची ओळख होते. शिवसृष्टीमधून या गुणांचा प्रसार नव्या पिढीत होण्याची अपेक्षा यानिमित्ताने करू या. शिवशाहिरांच्या प्रयत्नास संपूर्ण सदिच्छा’, असा मजकूर लिहिलेला असून खाली शरद पवार यांची सही दिसत असून या सहीच्या खाली १६-५-१९७४ ही तारीख देखील दिसत आहे.

शरद पवार यांच्यावर टीका करताना निलेश राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘पवार साहेबांना मधूनच बाबासाहेब पुरंदरे आठवतात. कारण दोन महिने झाले पवार साहेबांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद पेटवलेला नाही. महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यामध्ये पवार साहेबांना नेहमीच समाधान मिळालेले आहे’.

बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कुणीही केला नाही, असे परखड मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवांचे योगदान काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळा काल पुण्यामध्ये पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पवार यांनी पुरंदरे यांच्या लिखाणावर ही टीका केली होती.

महाराजांबद्दल अभिमान, ही शिवशाहिरांची प्रेरणा...

‘बाबासाहेब पुरंदरे यांच्या भगिरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली. महाराजांबद्दल अपूर्व आत्मीयता, अभिमान ही शिवशाहिरांची प्रेरणा असल्याने शिवसृष्टी जिवंत वाटते. या निमित्ताने प्रखर, राष्ट्रभक्ती, अपार मातृप्रेम, स्वच्छ चरित्र्य या महाराजांच्या खास गुणांची ओळख होते. शिवसृष्टीमधून या गुणांचा प्रसार नव्या पिढीत होण्याची अपेक्षा निमित्ताने करू या. शाहिरांच्या प्रयत्नास संपूर्ण सदिच्छा’, असा मजकूर लिहिलेला असून खाली शरद पवार यांची सही दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >