इंदापूर (वार्ताहर) : मुळशी धरणातून कुंडलीका नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर करीत रिव्हर राफ्टींगचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. या रिव्हर राफ्टींगमुळे रायगड जिल्ह्यातील कोलाड आता सर्वश्रुत झाले आहे. पण नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र वापरण्यासाठी बळीराजा असो किंवा पाण्याची योजना असो, त्यांना पाटबंधारे व महसूल विभागाचे नियम आहेत. त्यांना फाटा देऊन गेली अनेक वर्षे हा व्यवसाय सुरू आहे.
कुंडलीका नदी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या या व्यवसायामुळे लघु पाटबंधारे विभागाला लाखो रुपयांचा कर रूपात महसूल मिळाला पाहिजे होता. परंतु नदीच्या पाण्यात जोरदार प्रवाहासोबत वाहत जात थ्रील अनुभवणाऱ्या पर्यटकांच्या रूपाने मिळणारा महसूल हा खासगी उद्योजक मिळवत आहे.
त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडतो आहे. याकडे लघू पाटबंधारे विभागीय अधिकारी वर्ग दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. कोलाडच्या कुंडलीका नदीत जे वॉटर स्पोर्ट्स व रिव्हर राफ्टिंग सुरू आहेत ती कायदेशीर आहे की बेकायदेशीर? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.