
नवी दिल्ली (हिं.स.) : राष्ट्रपती मनोनित नवनियुक्त राज्यसभा सदस्य, प्रथितयश दिग्गज संगीत सम्राट, बहुभाषी संगीत दिग्दर्शक 'ईसैज्ञानी' पद्म विभूषण इलियाराजा यांनी सोमवारी राज्यसभा सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 'ईसैज्ञानी' पद्म विभूषण इलियाराजा यांनी तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. इलियाराजा यांनी लता मंगेशकर, एस पी बालसुब्रमण्यम, यांच्यासह अनेक मान्यवरांसोबत काम केले आहे. इलियाराजा यांना तेलुगू कन्नड, हिंदी, तमिळ आणि इंग्रजीचे उत्तम ज्ञान आहे. संगीतकार इलियाराजा ऑर्केस्ट्रेटर, कंडक्टर, अरेंजर, गीतलेखक, गायक, लेखक, निर्माता अशा अनेक भूमिका यांनी निभावल्या आहेत. युवा संगीतकार युवान शंकर राजा इलियाराजा यांचे पुत्र आहेत.
इलियाराजा जी यांच्या सर्जनशील प्रतिभेने पिढ्यानपिढ्या लोकांना मोहीत केले आहे. त्यांची कामे अनेक भावना सुंदररित्या प्रतिबिंबित करतात.तितकाच प्रेरणादायी आहे त्याचा जीवन प्रवास - त्यांची जडणघडण विनयशील पार्श्वभूमीतून झालेली आहे आणि त्यांनी खूप काही साध्य केले आहे. त्यांना राज्यसभेवर नामांकन मिळाल्याचा आनंद आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते.