नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेटपटू करुणा जैनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. या भारतीय महिला यष्टीरक्षक खेळाडूने रविवारी वयाच्या ३६व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. “मी अतिशय आनंदी आणि समाधानी भावनांसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करते आणि खेळासाठी काहीतरी योगदान देण्यासाठी उत्सुक आहे”, असे करुणाने निवृत्ती जाहीर करताना म्हटले आहे.
करुणाने बीसीसीआय, एअर इंडिया, कर्नाटक, पुद्दुचेरी यांचेही आभार मानले आहेत. “यापैकी प्रत्येकाने मला खेळ आणि जीवनाबद्दल काहीतरी वेगळे शिकवले आणि आज मी जे काही आहे, त्यांच्यामुळेच आहे”, असेही तिने म्हटले आहे.
बेंगळूरु येथे जन्मलेल्या करुणाने तिच्या कारकिर्दीत भारत, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. करुणाने नोव्हेंबर २००५ मध्ये दिल्लीत इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने ५ कसोटी सामन्यांत १९५ धावा केल्या आहेत. कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट २०१४ मध्ये खेळला होता.