खेड (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून मुसळधार बरसण्यास सुरुवात केल्याने तालुक्यातील नारिंगी, चोरद व जगबुडी नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली. यापैकी जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडून वाहत होते.
पावसाने ४ दिवस विश्रांती घेतली होती. दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र रविवारी सकाळपासून संततधार लागल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली. रविवार असल्याने येथील बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, ४ दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसाने शेतकरी वर्ग लावणीची कामे पूर्ण करण्याच्या बेतात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर पुन्हा वाढला असल्याने नद्यांच्या पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.