नवी दिल्ली : लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांना सभागृहातून निलंबित केले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यापूर्वी सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी गोंधळ घालत असलेल्या काँग्रेसच्या चार खासदारांची नावे घेतली आणि नियम ३७४ अन्वये या चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.
तत्पूर्वी विरोधी पक्षातील खासदारांनी सोमवारी सभागृहात घोषणाबाजी आणि फलक दाखवून महागाई, स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत झालेली वाढ या मुद्द्यांवर केंद्राशी चर्चा करण्याची मागणी केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना फटकारले आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले. ओम बिर्ला म्हणाले, “हे लोकशाहीचे मंदिर आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही सदस्यांची जबाबदारी आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे.”
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, “तुम्हाला चर्चा करायची असेल तर मी त्यासाठी तयार आहे. पण तुम्हाला सभागृहात फक्त फलक दाखवायचे असतील तर तुम्ही दुपारी ३ नंतर सभागृहाबाहेर हे करू शकता. सभागृह चालायला हवे असे देशातील जनतेला वाटते.” लोकसभेच्या अध्यक्षांनी खासदारांना ताकीद दिली की, सभागृहात फलक घेऊन आलेल्या कोणत्याही खासदाराला कामकाजात भाग घेऊ दिला जाणार नाही.
दरम्यान, खासदारांच्या निलंबनाबाबत काँग्रेसकडूनही निवेदन देण्यात आले. आमच्या खासदारांना निलंबित करून सरकार आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ते लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.