
देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्यावतीने उभारलेल्या शहीद जवान स्मारकासाठी HPT-३२ या प्रकारचे लढाऊ विमान मंजूर झाले आहे. यासंबंधीचे पत्र रक्षा मंत्रालयाकडून २२ जुलै रोजी प्राप्त झाले आहे.
नव्या पिढीच्या मनात देशाप्रती, जवानांप्रती आदर निर्माण व्हावा तसेच हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशसेवेची भावना मनात रुजावी यासाठी संस्थेने शहीद जवान स्मारक उभारले. शहीद जवान स्मारकामध्ये टी-५५ रणगाडा, जीपवर माऊंट केलेली RCL Ieve, INS दिल्ली लढाऊ नौकेची प्रतिकृती असून आता लढाऊ विमान दाखल होणार आहे. संस्थेसाठी तसेच देवरुखसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, एअरमार्शल हेमंत भागवत आणि शहीद स्मारकाचे आधारस्तंभ मदन मोडक यांचे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी विशेष आभार मानले.