तलासरी (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नऊ अपघातप्रवण क्षेत्र असून या अपघातप्रवण क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात अपघात होऊन यात अनेक बळी गेलेले असून मोठ्या संख्येने लोक जायबंदी होत आहेत. अच्छाड येथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात बारा आदिवासी मुली गंभीर जखमी झाल्या. अच्छाड येथे औद्योगिक क्षेत्र असून सकाळ-संध्याकाळ येथे कामगारांना घेऊन येणारी जाणारी वाहने मोठ्या संख्येत असतात त्याना महामार्ग ओलांडावा लागतो. पण याच वेळी महामार्गांवर भरधाव वाहनेही जात असतात. त्यामुळे येथे नियमित अपघात होतात.
अच्छाड येथे असलेल्या अपघातप्रवण क्षेत्रात आतापर्यंत ३४ अपघात होऊन यात ३० इसमांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी भुयारी मार्ग किव्हा उड्डाणपूल बांधावा, याबाबत तलासरी पोलिसांनी अनेक वेळा भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांना पत्र दिले. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. येथे वारंवार होणाऱ्या अपघातामुळे खासदार राजेंद्र गावित यांनी या अपघातप्रवण क्षेत्र येथे भेट देऊन उड्डाणंपुलाची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी ती मान्य केली व या ठिकाणी तसेच तलासरीजवळील अन्य दोन ठिकाणी उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. पण या उड्डाणपुलांच्या बांधकामाला अजून मुहूर्त मिळाला नसल्याने पुलांचे काम रखडले असल्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचे मृत्यू होत आहेत. पण अजून बळी गेल्यावर प्राधिकरण पुलांचे काम सुरू करणार का?, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत महामार्गांवर अपघातप्रवण क्षेत्राबरोबर महामार्गवरील हॉटेलमध्ये जाण्यासाठी अनधिकृत कटही मोठ्या प्रमाणात आहेत. या अनधिकृत कटवरून रस्ता ओलांडताना अपघातात आदिवासी लोकांचे मृत्यू होत आहेत. पण या अनिधिकृत कटकडेही प्राधिकरणाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. महामार्गांवर अच्छाड नवकार, काजली चाणक्य नगरी, वरवाडा, आरोमा हॉटेल, सूत्रकार फाटा, वडवली निलगिरी हॉटेल, वडवली शिवम शोरूम, आरटीओ चेक पोस्ट, दापचरी रबर बोर्ड ही नऊ ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्र असून येथे वारंवार अपघात होतात. हे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तलासरी पोलिसांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्राधिकरणाला याकडे गांभीर्याने बघायला वेळ नाही, हे आदिवासी जनतेचे दुर्दैव आहे.