मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून धमकीचे सत्र सुरू झाले आहे. सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना आता प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा अभिनेता पती विकी कौशल या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे दोघे काही दिवसांपूर्वीच लग्नबेडीत अडकले. सुखी संसाराला सुरुवात झाल्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणीतरी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारानंतर विकी कौशलने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. विकी कौशलच्या तक्रारीवरून सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना धमकी कुणी दिली, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमान खानला धमकी देण्यात आली होती. सलमानला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. ५ जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. ‘सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू’, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.