राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद

Share

सुकृत खांडेकर

द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजेंद्र प्रसाद ते रामनाथ कोविंद असे चौदा राष्ट्रपती झाले. प्रत्येकाची कारकीर्द वेगळी होती. झैलसिंग यांनी राजीव गांधी सरकारला नमवले होते, तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पंडित नेहरू यांना तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचा राजीनामा घेणे भाग पडले होते.

राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती. २६ जानेवारी १९५० ते १३ मे १९६२ ही त्यांची कारकीर्द. १९५२ मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी डाव्या पक्षांचे उमेदवार प्रा. के. टी. शहा यांचा पराभव केला. १९५७ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार नारेंद्र नारायण दास यांचा पराभव केला. १९५१ मध्ये पंडित नेहरूंनी हिंद कोड बिलाचा प्रस्ताव पाठवला, तेव्हा कोणतीही हिंदू परंपरा जनमत घेतल्याशिवाय रद्द करू नये, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी नेहरूंना पत्र लिहून हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाकडे विचारार्थ पाठवावा, असे निर्देश दिले. दि. ११ मे १९५१ रोजी राजेंद्र प्रसाद हे सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला गेले तेव्हा पंडित नेहरूंनी राष्ट्रपतींनी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला जाणे योग्य नाही, असे म्हटले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी फाशीची शिक्षा झालेल्या १८० दोषींना दया दाखवली.

सर्वपल्ली राधाकृष्णन हे १९६२ ते १९६७ काळात राष्ट्रपती होते. १९५४ मध्ये ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पेशाने शिक्षक असलेले राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती होते. चीनने केलेल्या आक्रमणामुळे भारताची जी अवस्था झाली, त्याबद्दल त्यांनी पंडित नेहरूंच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या दबावामुळेच संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांचा राजीनामा घेणे नेहरूंना भाग पडले. राधाकृष्णन यांच्या सूचनेमुळेच दर वर्षी ५ सप्टेंबरला देशात शिक्षक दिन साजरा केला जातो.

झाकीर हुसेन हे भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती १९६७ ते १९६९ या काळात होते. वयाच्या तेवीसाव्या वर्षीच त्यांनी जमिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीची स्थापना केली. ते राज्यपाल व उपराष्ट्रपतीही होते. केंद्रीय कृषिमंत्री पदावर राहिलेले फखरूद्दीन अली अहमद हे दुसरे मुस्लीम राष्ट्रपती. त्यांच्याच काळात इंदिराजींनी देशावर आणीबाणी जारी केली होती. दि. २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींची भेट घेतली व देशावर आणीबाणी लागू होत असल्याचे सांगितले. रात्री अकरा वाजता इंदिराजींनी राष्ट्रपतींना या निर्णयासंबंधीची फाइल पाठवली व त्यावर त्यांनी स्वाक्षरी केली. अशा महत्त्वाच्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरीही घेतली गेली नव्हती.

‘भारतरत्न’ म्हणून गौरविलेले वराहगिरी वेंकट गिरी १९६९ ते १९७४ या काळात राष्ट्रपती होते. झाकिर हुसेन यांच्या निधनानंतर गिरी हे ३ मे १९६९ ते २० जुलै १९६९ या काळात कार्यवाहक राष्ट्रपती होते. त्यावेळच्या काँग्रेस सिंडिकेटने इंदिरा गांधी यांना न विचारताच राष्ट्रपतीपदासाठी नीलम संजीव रेड्डी यांचे नाव जाहीर केले. तेव्हा इंदिराजींनी आंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करावे, असे आवाहन केले होते. १६ ऑगस्ट १९६९ रोजी निवडणूक झाली. गिरी हे ४८.१ टक्के मते मिळवून विजयी झाले व नीलम संजीव रेड्डी पराभूत झाले. १९७१ च्या पाकिस्तान युद्धानंतर दोन देशांत झालेल्या सीमला करारावर आणि १९६९ मध्ये १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. गिरी यांनी घाईघाईने या निर्णयावर स्वाक्षरी केली, अशी त्यांच्यावर टीका झाली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले नीलम संजीव रेड्डी हे पहिले बिगर काँग्रेसी राष्ट्रपती झाले. १९७७ मध्ये केंद्रात जनता पक्षाचे सरकार आल्यावर त्यांना राष्ट्रपतीचे उमेदवार घोषित करण्यात आले. इंदिरा गांधींनी त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता. ते बिनविरोध निवडून आले. प्रिन्स चार्ल्सच्या विवाहाला उपस्थित राहण्याच्या मुद्द्यावरून इंदिरा गांधींना त्यांनी आक्षेप घेतला होता. सरकार त्यांना विदेशात पाठवणार नसेल, त्या खासगी भेटीसाठी जाऊ शकतात, असे त्यांनी म्हटले होते. देशाची आर्थिक स्थिती खराब असल्याने ते आपले ७० टक्के वेतन सरकारी खजिन्यात जमा करीत असत. ३४० खोल्या असलेल्या राष्ट्रपती भवनमध्ये ते एका खोलीत राहत असत.

झैलसिंग हे देशाचे एकमेव झालेले शीख राष्ट्रपती. १९८२ ते १९८७ या त्यांच्या काळातच अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार झाले, इंदिरा गांधींची हत्या झाली आणि दिल्लीत शीख विरोधी झालेल्या दंगलीत शेकडो शिखांचे शिरकाण झाले. निवडणूक काळात झैलसिंग यांनी इंदिराजींनी सांगितले, तर आपण झाडू मारून साफसफाई करायलाही तयार आहोत, असे म्हटले होते. १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार झाल्यावर ते ८ जून १९८४ ला सुवर्ण मंदिराला गेले तेव्हा त्यांच्या दिशेने गोळीबार झाला, पण ते बचावले. राजीव गांधी पंतप्रधान असताना, कोणतेही पत्र उघडून बघण्याचा अधिकार सरकारला देणाऱ्या टपाल सुधारणा विधेयकावर झैलसिंग यांनी स्वाक्षरी करायला नकार दिला होता.

केंद्रात अर्थ व संरक्षणमंत्री पदावर राहिलेले आर. वेंकटरमण १९८७ ते १९९२ या काळात राष्ट्रपती होते. १९८९ मध्ये बहुमत नसताना त्यांनी राजीव गांधींना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यावेळी जनता पक्ष, भाजप, समवेत छोट्या पक्षाच्या राष्ट्रीय आघाडीकडे बहुमत होते. १९५२ मध्ये मध्य प्रांताचे (भोपाळ) मुख्यमंत्री राहिलेले व नंतर केंद्रात संचारमंत्री म्हणून काम केलेले शंकर दयाळ शर्मा १९९२ ते १९९७ या काळात राष्ट्रपती होते. १९९६ मध्ये भाजपकडे केंद्रात बहुमत नसतानाही त्यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. पण त्यांचे सरकार तेरा दिवसांतच कोसळले.

के. आर. नारायणन हे देशाचे पहिले दलित राष्ट्रपती झाले. १९९७ ते २००२ हा त्यांचा कार्यकाळ होता. त्यापूर्वी ते चीन, अमेरिका आदी देशात भारताचे राजदूत होते. त्यांनी निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार टी. आर. शेषन यांचा पराभव केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेळा लोकसभा बरखास्त केली. १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्कारप्राप्त ए. पी. जे. अब्दुल कलाम हे २००२ ते २००७ या काळात राष्ट्रपती होते. डीआरडीओ व इस्त्रोमध्ये मोठे वैज्ञानिक होते. रोहिणी उपग्रह व अणवस्त्र चाचणी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राष्ट्रपती असताना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यास त्यांनी मनाई केली होती व त्याचा खर्च अनाथालयातील मुलांसाठी पाठवला होता. प्रतिभा देवीसिंह पाटील ह्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. २००७ ते २०१२ त्यांची कारकीर्द. महाराष्ट्रात त्या मंत्री होत्या. निवडणुकीत त्यांनी एडीएनचे उमेदवार भैरवसिंह शेखावत यांचा पराभव केला. त्यावेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केले होते. फाशीची शिक्षा झालेल्या ३९ दोषींपैकी ३४ जणांना त्यांनी दया दाखवली.

प्रणव मुखर्जी २०१२ ते २०१७ राष्ट्रपती होते. त्यापूर्वी केंद्रात ते संरक्षण व अर्थमंत्री होते. २०१६ मध्ये गुजरात दहशतवादविरोधी विधेयक त्यांनी पुनर्विचारार्थ पाठवले, तेव्हा मोठा वाद झाला होता. राष्ट्रपतींचा उल्लेख ‘हिज एक्सीलेंसी’ असा न करता ‘महामहीम’ असा करावा म्हणून त्यांनी सरकारला पत्र पाठवले होते. रामनाथ कोविंद यांची कारकीर्द २०१७ पासून सुरू झाली. ते भाजपचे प्रवक्ता होते तसेच राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदारी संभाळली. यूपीए काळातील लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचा त्यांनी निवडणुकीत पराभव केला. जून २०२१ मध्ये त्यांनी म्हटले की, आपल्याला महिना ५ लाख रुपये वेतन मिळते. त्यातील पावणेतीन लाख रुपये कर भरावा लागतो.… यापूर्वीच्या तीन राष्ट्रपतींनी गुजरात दहशतवादविरोधी विधेयक पुनर्विचारार्थ परत पाठवले होते. पण कोविंद यांनी त्याला नोव्हेंबर २०२१ मध्ये मंजुरी दिली.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago