सुभाष म्हात्रे
अलिबाग : मागील वर्षी जुलै महिन्यात २२ व २३ जुलै रोजी कोकणात झालेल्या अतिवृष्टीने मनुष्यहानी, वित्तहानी, पशू-पक्षीहानी याबरोबरच अनेकजण बेघर झाले होते; परंतु शासनाने बाधित झालेल्या लोकांना मदतीचा हात देत त्यांना दिलासा देण्याचे काम केले.
महाड तालुक्यातील तळीये हे सुमारे तेराशे लोकवस्तीचे गाव दरड कोसळून पूर्णतः नष्ट झाले होते. अतिवृष्टीमुळे तळीये येथील कोंडाळकरवाडी, बौद्धवाडी येथील ६६ घरांवर दरड कोसळून जीवितहानी झाली. या गावात राहत असलेली २७१ कुटुंबे एकाच दिवसात बेघर झाली. ८७ लोक मृत्युमुखी पडले आणि काही जखमी झाले होते. केवळ मनुष्यच नाही, तर ५९ पशुधन आणि ११२ कोंबड्या देखील मृत्युमुखी पडल्या होत्या.
गृहनिर्माण विभागांतर्गत म्हाडाने स्थानिकांचा निवारा परत उभारण्यासाठी कार्य सुरू केले, तर जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्पुरत्या निवारा शेडसाठी पुढाकार घेत काही खासगी कंपन्यांच्या मदतीने तळीये येथील आपद्ग्रस्त कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले.तळीये येथील बाधित घरांचे तात्पुरते पुनर्वसन म्हणून या बाधितांना एकूण २६ कंटेनर होम मूलभूत सुविधांसह उपलब्ध करून दिले आहेत. तळीये येथील एकूण २७१ घरांचे पुनर्वसन करायचे आहे. म्हाडाने येथील सर्व्हे केल्यानंतर एकूण २३१ घरांचा ले-आऊट तयार करण्यात आला असून, या ठिकाणी ४० घरांच्या पुनर्वसनासाठी जागा कमी पडत असल्यामुळे एकूण ४.५७.१० हे. आर. अतिरिक्त जागा म्हाडा कार्यालयास सुचविण्यात आली. त्यांचा कुटुंब सर्व्हे पूर्ण झाला आहे.
तळीये येथील मूलभूत सोयीसुविधेचे कामकाज जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यामार्फत करण्यात येत आहे तसेच ६६ घरांचे पुनर्वसन म्हाडाकडून प्राधान्याने करण्यात येत आहे. म्हाडाकडून घराचे पुनर्वसन करण्यात येत असून, इतर सुविधा शासनाच्या इतर विभागाकडून पुरविण्यात येत आहेत.