दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुरुड येथे समुद्राला आलेल्या उधाणामुळे येथील बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुरूबन, नारळ, पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
समुद्र किनाऱ्यालगत धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राचे पाणी बागायतींमध्ये जात आहे. या उधाणामुळे मोठे नुकसान होत आहे. याबाबत येथील बागायतदारांनी मेरीटाईम बोर्डाला कळवले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी येथील बागायतदार मागणी करत आहेत. दर वर्षी पावसाळ्यात मोठ्या भरतीवेळी हे पाणी चक्क बागेत घुसते.
या ठिकाणी बंधारा आवश्यक आहे. तशी मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याचा आरोप येथील बागायतदार करत आहेत.