Monday, July 22, 2024
Homeमनोरंजनफिरुनी नवी जन्मेन मी...

फिरुनी नवी जन्मेन मी…

श्रीनिवास बेलसरे

“पुढचं पाऊल” नावाचा सिनेमा फार पूर्वी म्हणजे १९५०ला होता. निर्माता-दिग्दर्शक होते राजा परांजपे! सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत हंसा वाडकर, पु. ल. देशपांडे आणि मराठीचे वाल्मिकी ग. दी. मा. यांच्या भूमिका होत्या. अलीकडेच याच नावाची टीव्ही मालिकाही येऊन गेली.दुसरा ‘पुढचं पाऊल’ आला १९८६ला! कथा, पटकथा आणि संवाद लेखक होते जयवंत दळवी, दिग्दर्शक राजदत्त आणि कलाकार होते यशवंत दत्त, आशालता, निळू फुले, प्रशांत दामले, सुहासिनी देशपांडे, सुमंत मस्तकार, इर्शाद हाश्मी आणि मानसी मागीकर. पुढचं पाऊल ही हुंडाबळीची कथा! त्याकाळी सर्रास सुरू असलेल्या या भयानक प्रथेचे क्रूर स्वरूप सिनेमाने उघड करून दाखवले. यातील एक गीत –

“जो तो आपापला येथे,
कुणी ना आधार,
मनाचिया घावावरी, मनाची फुंकर”

हे सुधीर फडके यांनी गायलेले, गाणे एखाद्या अभंगाइतके सुंदर झाले होते. अशाच दुसऱ्या गाण्यात सुधीर मोघेंनी घरगुती छळाने गांजलेल्या, तरीही जीवनाकडे आशावादी दृष्टीने बघणाऱ्या, तत्कालीन स्त्रीच्या मन:स्थितीचे खूप सुंदर चित्रण केले होते. रेडिओवरील ‘आपली आवड’ या कार्यक्रमात आशाताईंचे हे गाणे हमखास लागत असे. सुधीर फडके यांचे सुरेल संगीत आणि नेटकी, भावपूर्ण रचना यामुळे गाणे आजही अनेकांच्या तोंडी आहे. हुंड्यासाठी सुरू असलेला आपला छळ कधीतरी संपेल, पतीला आपले महत्त्व कळेल, संसारातील स्वप्ने साकार होतील, अशी आशा धरून बसलेली, निमूटपणे सर्व सहन करणारी सून ही त्याकाळी अनेक घरातले एक सत्यच होते. तिच्या तोंडी हे गाणे देऊन दिग्दर्शकाने अनेक पिढ्यांना खोटा का होईना, पण मोठा दिलासा दिला होता. पैशांसाठी सुनेच्या नेहमी होणाऱ्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर मोघे यांचे शब्द कुणाही संवेदनशील मनाला भेदून जातात.

३०-४० वर्षांपूर्वीच्या शेकडो सासुरवाशीणींच्या मनातील भावनांचे हे गाणे आपल्यासमोर उघड करते –

एकाच या जन्मी जणू,
फिरुनी नवी जन्मेन मी…

जेव्हा हे अन्यायी जग बदलेल आणि स्त्रीला सन्मान, समानतेची वागणूक मिळेल, तेव्हा ते वास्तवही एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटेल. स्त्रीच्या वेदना संपतील. तिच्या मनात खोल रुजलेली भीती निघून जाईल, अशी त्या नायिकेला आशा आहे –

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे,
जातील साऱ्या लयाला व्यथा,
भवती सुखाचे स्वर्गीय वारे,
नाही उदासी ना आर्तता…
ना बंधने वा नाही गुलामी,
भीती अनामी विसरेन मी…

तिला वाटते आपल्याला हवे तसे झाले, तर आताची मी मलाच हरवून बसेन. माझे व्यक्तिमत्त्व इतके बदलेल की ते मलाच ओळखू येणार नाही. माझ्यातल्या जुन्या ‘मी’ला असे हरवल्यामुळेच, तर मला खरी मी
सापडू शकेन! आज तरी ते हरवणेच महत्त्वाचे आहे. तशी ही त्या काळच्या स्त्रीची किती साधीभोळी स्वप्ने! किती भाबड्या अपेक्षा! पण तेही पूर्ण होणे शक्य नसे. अनेक ‘चांगल्या’ म्हणवणाऱ्या पण असंस्कृत, अघोरी घरात स्टोव्हचा भडका उडे. खेडे असेल, तर पेटती चिमणी नेम धरून बरोबर घरातील स्त्रीच्याच अंगावर पडे आणि तिची साडी पेटत असे! आज या इतिहासाचा नुसता विचार केला तरी गलबलून येते…

हरवेन मी, हरपेन मी,
तरीही मला लाभेन मी,
एकाच या जन्मी जणू,
फिरुनी नवी जन्मेन मी…

नायिकेला तिच्या आशावादी मन:स्थितीत सगळे काही शक्यच वाटू लागते आणि ती सुखस्वप्ने रंगवू लागते. एका मनस्वी मूडमध्ये हरखून ती स्वत:शीच गाते आहे –

आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या,
फुलतील कोमेजल्यावाचुनी…
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी,
या वाहणाऱ्या गाण्यातुनी…

कविवर्य सुधीर मोघे हे एखादा मूड तयार करताना तो शेवटापर्यंत नेतात. या गाण्यात जेव्हा नायिका आशावादाचा सूर लावते आहे, तेव्हा गीतकार सगळ्या निसर्गनियमांच्या पलीकडे जाऊन भाष्य करतात. हिवाळ्यात सहसा झाडांना नवी पाने येत नसतात. नवी पालवी येते ती वसंतात! मात्र मोघेची नायिका म्हणते मी तर शिशिर ऋतमध्ये सुद्धा नव्याने जन्म घेऊन, उगवेन, फुलेन बहरेन!

लहरेन मी, बहरेन मी,
शिशिरांतूनी उगवेन मी…

केवढा दुर्दम्य आशावाद! मोघेंनी असाच आशावाद मांडला होता. ‘शापित’ नावाच्या सिनेमातील एका गाण्यात. ते गाणे केवढ्या आशावादी सुरात सुरू होते, पाहा –

दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल…

‘शापित’मधली नायिका तर आपल्या जोडीदाराबरोबर आपल्या पोटातील अंकुरासाठी स्वप्न पाहते आहे. तिला आशा आहे, आपले सध्याचे दारिद्र्य निघून जाईल. तरीही वास्तवाचे भान असल्याने तिला आपल्या भावी अपत्याची काळजी आहे. त्याला आपण चांगले

जीवन देऊ शकू का? अशी चिंताही मनात आहे –

अवकळा समदी जाईल निघूनी,
तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी
मिळंल का त्याला, ऊन, वारा, पानी, राहील का सुकल
ते तुझ्या माझ्यावानी?

अनेक चिंता सतावत असतानाही मोघेंच्या नायिकेचा आशावाद त्या सगळ्यावर मात करण्याइतका जबरदस्त आहे –

उडूनिया जाईल ही आसवांची रात,
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट…
पहाटच्या दवावानी तान्हं तुजं-माजं
सोसंल गं कसं त्याला जीवापाड ओझं?

गाण्याच्या शेवटच्या ओळी, तर जीवनवादाचा कहर आहेत. मला नेहमी वाटते, मराठीतील आपल्या कवींचा पुरेसा गौरव आपण कधी केलाच नाही. सुधीर मोघेंनी जणू श्याम बेनेगलांच्या ‘अंकुर’चा केवढा मोठा आशय फक्त २ ओळींत भरलाय पाहा –

इवल्याशा पणतीचा इवलासा जीव,
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव!
दिस जातील, दिस येतील,
भोग सरंल, सुख येईल…

कधी-कधी गडद अंधारात असा तेवणारा छोटासा दिवा पाहिला तरी किती बरे वाटते. म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -