नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशाच्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे आता दिवसा आणि रात्री देखील तिरंगा फडकाविता येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्ट या काळामध्ये ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम हे भारताची ‘ध्वज संहिता-२००२’ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१’ अंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत. आता २००२ च्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता पॉलिस्टरपासून तयार करण्यात आलेले तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येईल. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना याबाबतचे पत्र पाठविले आहे.
याआधी केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज फडकाविता येत असे तसेच मशीनवर तयार करण्यात आलेले तसेच पॉलिस्टरचे राष्ट्रध्वजाला परवानगी दिली जात नसे.