मोराच्या पंखात दोरा

  172

रमेश तांबे


एक होता मोर. त्याच्या पंखात अडकला होता दोरा. दोऱ्यामुळे त्याला उडता येत नव्हते की, धड चालता येत नव्हते. त्याचे सारे अंग खूपच ठणकत होते. बिचारा दोरा सोडवता सोडवता गेला दमून. मग झाडाखाली राहिला बसून! त्याला वाटले कुणाला बोलवावे. कुणाला आपले दुःख सांगावे!


तेवढ्यात तिथे आले कबुतर. गुटर्र गू आवाज करत. कबुतराला बघताच मोर म्हणाला, “कबुतरा माझं ऐक ना जरा, पंखात माझ्या अडकलाय दोरा. मला थोडी मदत कर. पंखातला माझ्या दोरा धर. मी गोल गोल फिरतो, दोऱ्यातून मला मोकळं करतो.” कबुतर म्हणाले, “नको रे बाबा, तुझ्यासाठी वेळ नाही मला. लवकर जायचंय माझ्या घराला. तू तर एवढा सुंदर पक्षी, पंखावर तुझ्या छान छान नक्षी. आमच्याशी बोलायला तुला वेळच नसतो. रंगाला आमच्या फिदीफिदी हसतो.” मग कबुतर गेले उडून. मोर राहिला तसाच बसून.


थोड्या वेळाने आला कावळा. रंग त्याचा केवढा काळा. मोराने त्याला हाक मारली. “कावळ्या कावळ्या इकडे ये जरा, पंखात माझ्या अडकलाय दोरा. मला थोडी मदत कर, पंखातला माझ्या दोरा धर. मी गोल गोल फिरतो, दोऱ्यातून मला मोकळं करतो.”


कावळा म्हणाला, “नको रे मोरा नेहमीच असतो तुझा तोरा. आवाज माझा आहे चिरका. रंग माझा केवढा काळा. करतोस माझी सदैव निंदा, म्हणे कावळा आहे खूपच गंदा!” असं म्हणून कावळा गेला उडून, मोर राहिला तसाच बसून!


आता मोर करू लागला विचार. माझे नाव झाले आहे खराब. कोणच आपल्याला मदत नाही करीत. माझंच वागणं आहे वाईट! पंखांचा मला केवढा अभिमान, त्यावरून करतो साऱ्यांचा अपमान. मोराच्या डोळ्यांत आले पाणी, मदतीला माझ्या नाही कुणी. मग मोराने ठरवले चांगले वागायचे, सारेच पक्षी माझे भाऊबंद, दुसऱ्यांना हसणे करूया बंद!


मोराचे मन आता स्वच्छ झाले. चिमणीने हे सारे जवळून पाहिले. मग टुणटुण उड्या मारीत, चिमणी गेली मोराजवळ आणि मोराला म्हणाली, “रडू तुझे आवर, आता स्वतःला सावर. मी दोरा चोचीत धरते, संकटातून तुझी सुटका करते.” मग चिमणीने दोरा चोचीत धरला. मोर स्वतःभोवती गोल गोल फिरला. सरसर सगळा दोरा निघाला. दोऱ्याच्या गुंत्यातून मोर सुटला. त्याला खूप आनंद झाला. “धन्यवाद चिमणीताई”, मोर म्हणाला.


चिमणी म्हणाली, “मोरा मोरा, आता करू नको तोरा. सारेच पक्षी आहेत समान. कुणीच समजू नये स्वतःला महान! कोण मोठं, कोण छोटं, कोण सुंदर कोण कुरूप. हा तर फक्त बघण्याचा दोष. देवाने बनवलंय साऱ्यांनाच खास.”


चिमणीचे म्हणणे मोराला पटले. त्याने तिचे पायच धरले. मोर म्हणाला, “चिऊताई चिऊताई आज माझे डोळे उघडले. कसे वागायचे ते समजले. यापुढे साऱ्यांसोबत मैत्री करीन, सगळ्यांसोबत मजेत राहीन!” मग झाले... चिमणी, मोर गेले उडून, गोष्ट माझी गेली संपून...!

Comments
Add Comment

नाटककार जयवंत दळवी

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर जयवंत दळवींना ‘साहित्यिक’ ओळख मिळण्याआधीची पंधरा-सोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली

आषाढी एकादशीनिमित्त...

सुंदर ते ध्यान : समतेची प्रेरणा ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... आषाढ सुरू होताच अवघ्या महाराष्ट्राला पंढरपूरच्या

‘जिथे शब्द थांबतात तिथे गुरू बोलतो...’

ऋतुजा केळकर आयुष्याच्या पहिल्या क्षणी, जेव्हा मी रडत या जगात आले, तेव्हा जिने मला कुशीत घेऊन शांत केलं, तीच माझी

ययाती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे राजा नहूषला यती, ययाती, संयाती, आयती, नियती व कृती असे सहा पुत्र होते. नहूषाला

आधुनिक काळातील ‘पिठोरा चित्रकला’

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीविषयी अनेक दिवस लेख लिहीत आहे. यामध्ये पूर्वी मधुबनी चित्रशैली आणि वारली

तुलना

ओंजळ : पल्लवी अष्टेकर आजच्या जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जितके एकमेकांशी जोडलेले आहोत,