प्रा. प्रतिभा सराफ
कॉलेजमध्ये जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी होते. बाजूला एक विद्यार्थी उभा होता. स्वतःहूनच माझ्याजवळ आला आणि बोलू लागला. त्याचे नाव संतोष. त्याच्या बोलण्यातून मला अनेक गोष्टी कळल्या… जसे त्याला वडील नाहीत, आई धुणं-भांड्याची कामे करते. त्याला दहावीत सत्तर टक्के गुण मिळाले आहेत. तो कोणत्या तरी लेखकाकडे लेखनिक म्हणून काम करतो आहे.
बोलता बोलता तो एक गोष्ट बोलून गेला की, त्याला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून त्याने सायन्स घेतले आहे. इतक्यात बस आली.आम्ही बसमध्ये चढलो. साहजिकच मी त्याचे तिकीट काढले. तेव्हा त्याने नाराजी व्यक्त केली. मी त्याला म्हटले, “तू जेव्हा कमवायला लागशील तेव्हा माझे टिकीट काढ.”
माझ्या मनात आले की, ज्या मुलाला दहावीत केवळ सत्तर टक्के गुण मिळाले आहेत, त्याला बारावीत असे कितीसे गुण मिळणार? आणि ज्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे, तर तो कसा काय डॉक्टर बनणार? पण त्याच्या अर्धोन्मीलित स्वप्नाला मी मनोमन शुभेच्छा दिल्या.
दहा-बारा वर्षांनंतरची गोष्ट.एकदा मी बसस्टॉपवर उभे होते. अचानक एक कार माझ्या बाजूला येऊन थांबली आणि खिडकीची काच खाली झाली. एका मुलाने हाक मारली,
“मॅडम या आत… कुठे सोडू?”
इतकं बोलून तो थांबला नाही. स्वतः उतरून हसूनच त्याने माझ्यासाठी दार उघडले. तो संतोष होता. त्याने एका हॉटेलसमोर गाडी थांबवली. आम्ही चहा घेतला. साहजिकच बिलाचे पैसे त्याने दिले.
चहा घेताना त्याने स्वतःविषयी अनेक गोष्टी सांगितल्या, किती कष्टपूर्वक बारावीत ब्यान्नव टक्के गुण मिळवले. एका सामाजिक संस्थेने कसे त्याचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. आता त्याला एका शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली… त्याचा थोडक्यात इतिहास कथन केला. स्वप्नातल्या कळ्या सुंदर असतात. पण फुललेल्या स्वप्नाचा दरवळ काही वेगळाच असतो, हे मात्र त्यादिवशी मी संतोष भेटल्यावर अनुभवले.