भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या १५व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. या निवडणुकीत ७१९ खासदारांसह देशभरातील ४ हजारांहून अधिक आमदारांनी मतदान केले होते, तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या २४ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. मुर्मू यांच्या विजयानंतर भाजपतर्फे देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. दिल्लीत विजय रॅली काढण्यात आली. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार विजयी झाल्यानंतर रॅली काढण्याची ही पहिलीच वेळ असेल. यावेळी तब्बल २० हजार लाडूंचे वाटप करण्यात आले. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. मुर्मू या ओदिशा राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत, तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. यूपीएच्या काळात काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदावर संधी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र यांनी सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून एकामागोमाग सुखद धक्के देण्याचे काम अविरत सुरू आहे. त्यांनी गेल्या सात वर्षांत शेतकरी, कष्टकरी, महिला – मुली, विद्यार्थी अशा सर्व घटकांसाठी राबविलेल्या अिभनव योजना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हे सर्व करताना ‘सबका साथ सबका विकास’ या घोषवाक्याचे ते तंतोतंत पालनही करताना दिसतात, हे अलीकडेच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी कुणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न होता. त्यासाठी अनेक नावांची चर्चाही सुरू झाली होती. पण पंतप्रधान मोदींनी इथेही सर्वांना धक्का देत झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल अशी सर्वसाधारण ओळख असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे नाव घोषित केले. ओदिशाच्या मयूरभंज या दुर्गम आदिवासी जिल्ह्यातील उपरबेडा गावातील मुर्मू यांना उमेदवारी देऊन मोदी यांनी समाजातील अगदी पिछड्या वर्गाला राजकीय मुख्य प्रवाहात आणून देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान हाण्याची संधी मिळवून दिली.
देशाच्या दुसऱ्या महिला आणि आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून त्या सोमवारी २५ जुलै रोजी पदग्रहण करणार आहेत. भारताभोवतालचे पाकिस्तान, श्रीलंका यांसारखे देश सत्तासंघर्षात, अस्थिरतेमध्ये अडकले आहेत. तेथील लोकशाहीच मुळात धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत देशातील आदिवासी समाजातील पहिली महिला व्यक्ती या ओळखीपलीकडे संघर्षातून वाट काढणाऱ्या कणखर नेत्या आणि सामान्य व्यक्तीला आपलेसे वाटेल असे व्यक्तिमत्त्व द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात भारताचे सर्वोच्च पद सन्मानाने आणि लोकशाही प्रक्रियेतून पदग्रहण करीत आहे, ही अत्यंत महत्त्वाची आणि आशादायी बाब आहे. राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प, कोणतेही अधिकार नसलेले काटेरी पद ही ओळख दूर सारून काम करणाऱ्या आजवरच्या शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांच्या यादीत त्यांचे नाव जोडले जात असताना त्यांच्यावरील जबाबदारीही अधिक वाढली आहे. ओदिशातील उपरबेडा या ३,५०० लोकवस्ती असलेल्या भागामधील एरवीचे जनजीवन अगदी सर्वसामान्य; पण गेले काही दिवस या सगळ्यांपलीकडे त्यांच्या चेहरावर वेगळीच चमक होती. त्यांच्या गावची एक लेक दिल्लीत जाणार आणि मोठ्या पदावर बसणार याचे अप्रुप या गावकऱ्यांना फार मोठे. गावात मिठाई वाटण्यात आली, जल्लोष करण्यात आला. राजकारणात येण्यापूर्वी मुर्मू यांनी शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९७९ ते १९८३ या काळात त्यांनी पाटबंधारे व ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणूनही काम केले. त्यानंतर १९९४ ते १९९७ या काळात त्यांनी मानद सहाय्यक शिक्षक म्हणूनही काम केले. मात्र त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परिस्थिती आड येऊ दिली नाही. गावातीलच शाळेत त्यांचे शिक्षण झाले. आजोबा आणि वडील पंचायत राज व्यवस्थेत गावचे प्रमुख असल्याने नेतृत्वाचे, राजकारणाचे बाळकडू त्यांना तसे घरातून मिळाले होते. भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कला शाखेत पदवी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली आणि काही वर्षे याच क्षेत्रात काम केले.
सन १९९७ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सन १९९७मध्ये पहिल्यांदा त्या नगरसेविका झाल्या. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नगरसेविका ते भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष हा प्रवासही मोठा आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांतून कस पाहणारा होता. त्यानंतर त्यांची झारखंडच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. ओदिशा विधानसभेने २००७मध्ये त्यांचा ‘नीलकंठ पुरस्कारा’ने गौरव केला. पारंपरिक व्यवसायांपलीकडील रोजगार संधींची या आदिवासी समाजाला आस आहे आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आदिवासी मुलींना नवी क्षितिजे खुणावत आहेत. मुर्मू यांच्या वाटेवरून चालण्याची त्यांची इच्छा आहे. या साऱ्यांच्या अपेक्षांना योग्य वाट आणि न्याय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल हे नक्की. ओदिशाच्या मयूरभंज या दुर्गम आदिवासी जिल्ह्यातील उपरबेडा गावापासून दिल्लीच्या रायसीना हिलपर्यंतचा द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास संघर्षमय आणि आव्हानांचा होता. वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातील खाचखळगे पार करत, आव्हानांना धीराने तोंड देत ही संघर्षकन्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत असून साऱ्या देशासाठी उडिया भाषेनुसार ‘बीरांगना’ ठरल्या आहेत. ओदिशाच्या मयूरभंज या दुर्गम आदिवासी जिल्ह्यातील उपरबेडा गावापासून दिल्लीच्या रायसीना हिलपर्यंतचा द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास संघर्ष आणि आव्हानांचा होता. वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातील खाचखळगे पार करत, आव्हानांना धीराने तोंड देत ही संघर्षकन्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत असून साऱ्या देशासाठी त्या त्यांच्या उडिया भाषेनुसार ‘बीरांगना’ ठरल्या आहेत. देश स्वातंत्र्याचे ७५वे वर्षं साजरे करत असतानाही त्या प्रतिनिधित्व करत असलेला आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असताना या समाजाची एक महिला राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेणार असून त्यांच्या या निवडीचे आणि त्यांची निवड करणारे नरेंद्र मोदी यांचे सर्वांनी कौतुक करायलाच हवे.