नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या दोन कर्मचा-यांनीच एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या एका खोलीत मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी रेल्वे कर्मचारी आहेत. यातील इतर दोघांनी आरोपींना साथ दिली आहे.
दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या पोलिसांनी या घटनेसंदर्भात कारवाई करत फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यात आरोपींना पकडण्यात आले आहे. हे चारही आरोपी दारूच्या नशेत होते.
मिळालेली माहिती अशी की, या पीडित महिलेचे वय २८ वर्ष असून यातील एका आरोपीशी महिलेची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. दरम्यान, त्या आरोपीने पीडित महिलेला काहीतरी कारण सांगून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर बोलवून घेतले आणि रेल्वे स्थानकावरील एका खोलीत बोलावून नेले. ही खोली प्लॅटफॉर्मवरील फूट ओव्हर ब्रिजखाली विद्युत विभाग आणि इतर विभागांतील उपकरणे ठेवण्यासाठी बांधण्यात आली आहे.
यानंतर त्या खोलीत त्यांनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या आरोपींनी महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचे समजते.
दरम्यान, पिडीत महिलेने शुद्धीवर आल्यानंतर पहाटेच्या सुमारास पोलिसांना कॉल केला. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर सामूहिक बलात्काराची बातमी ऐकून पोलिसही चक्रावून गेले. यानंतर रेल्वे पोलिसांसह रेल्वे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पीडित महिलेची चौकशी करुन प्रकरण जाणून घेतले. सामूहिक बलात्काराची घटना घडवणारा मुख्य आरोपी रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती जीआरपीला मिळाली आहे.