मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड – कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या व पर्यटकांचे केंद्रीय बिंदू व हिरव्या शालूने नटलेला माळशेज घाटाकडे हजारो पर्यटक येऊन येथील धबधब्याचा आनंद घेत असतात; परंतु या शनिवार रविवारपासून पर्यटकांनी आपला ओघ मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथील दीडशे ते दोनशे फूट उंचावरून पांढऱ्या शुभ्र धारेमध्ये कोसळणारा सिद्धगडचा आकर्षक धबधबा पाहण्यासाठी वळवला असून मुंबई, पुणे, दादर, चेंबूर, अंधेरी, मालाड, यांच्यासह अनेक ठिकाणाहून तसेच शहरातील पर्यटकांनी हजेरी लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा असलेला माळशेज घाट, यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सिद्धगड हे एक निसर्गाने नटलेले इतिहासकालीन एक ठिकाण आहे; परंतु गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धगडवरील धबधबे, अभयारण्य पाहण्यासाठी येथील वनखात्याने बंदी घातली होती; परंतु मागील रविवारपासून वनखात्यांनी बंदी उठवल्यानंतर सिद्धगडावरील धबधबे व पर्यटकांना आकर्षित करणारा सुभेदार धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे, अशी माहिती येथील वनखात्याचे वनपाल चिंतामण खंडवी यांनी दिली आहे.
पावसाळ्यात ट्रेकर्स तसेच पर्यावरण प्रेमी ही सिद्धगड धबधबा ट्रेकिंगसाठी तसेच निसर्गाचा मंडळात आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे. दीडशे ते दोनशे फूट उंचावरून शुभ्र धारेमध्ये कोसळणारा हा सुभेदार धबधबा पर्यावरणप्रेमींना पावसाळ्यात एक प्रकारे खुणावताना दिसत आहे. मुरबाडपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तसेच माळशेज घाटानंतर सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील सिद्धगड हे एक निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. मुरबाड – कर्जत रस्त्यावरील म्हसा या गावांमधून जाबुडे गावातून सिद्धगड परिसरात जाता येते. मुरबाड बस स्थानक ते म्हसा येथून २३ कि मी. अंतरावरील सिद्धगड हे परिसर हा भीमाशंकर अभयारण्यात येतो. जाबुर्डे या गावापासून पाच किमी अंतरावर हे विलोभनीय स्थळ आहे, तर जांबुर्डे गावाच्या परिसरातच अभयारण्यात अनेक धबधबे नजरेस पडतात. त्यामुळे आता माळशेज घाटानंतर पर्यटकांनी सिद्धगडावरील धबधबे पाण्यासाठी पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे.