मुंबई : नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती, असे स्पष्टीकरण राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्रानंतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या असे ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गटाकडून करण्यात येणारे आरोप खोटे असल्याचे वळसे पाटलांनी म्हटले आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असेही वळसे पाटलांनी म्हटले आहे.
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, दादा भुसे आणि दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरीटी नाकारली होती, असा आरोप भुसे, कांदे आणि केसरकर यांनी केला. यावरून आता राजकारण तापले आहे.
एकनाथ शिंदे नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांच्या काळात अनेक नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई झाली होती. त्यात अनेक नक्षलवादी मारले गेले होते. त्यामुळे त्यांना धमकीचे पत्र मिळाले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना झेड सुरक्षा देण्याचे टाळले होते, असेही शिंदे गटाने म्हटले होते. त्यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, राज्यात नव्याने अस्तित्त्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारने अनेक कामांना दिलेल्या मंजुरींना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे, अशा प्रकारचा निर्णय घेणे दुर्दैवी असल्याचे वळसे पाटील म्हणाले. असे करून राजकारण होईल. मात्र, यामुळे याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांवर होईल. त्यामुळे राजकारणासाठी कामांवर स्थगितीचा निर्णय घेणे उचित नाही, असे ते म्हणाले.
राज्यातील काही प्रकरणांचा तपास राज्य पोलिसांकडून काढून सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला असून, त्याचा तपास कुणीही करावा मात्र, तो योग्य पद्धतीने व्हावा हीच अपेक्षा आहे.