Friday, July 19, 2024

आसन

डॉ. मिलिंद घारपुरे

सकाळ सकाळचा योगासनाचा वर्ग. अर्धझोपेतल्या आळसावलेल्या शरीर मनाचा अजूनच नकार. तरीही आपण जातो. प्रार्थना, सूर्यनमस्कार, आसने अनुक्रमे. देहाच्या सुखस्थितीला कोणत्याही प्रकारे उगाचच कष्टात टाकणे म्हणजे व्यायाम अशी कोणीतरी व्याख्या केली आहे. (कोणीतरी म्हणजे मीच) आता… एखाद्या आसनाची सूचना होते… योगशिक्षकाच्या सूचना कानातून मनात मग देहात झिरपतात. विशिष्ट स्थिती घेतली जाते… सगळे शरीर, हात-पाय ताणले जातात. छाती, पोट, कंबर, मान, पाठ कुठे-कुठे असह्य ताण…

घेतलेली आसनस्थिती टिकवणं एक मोठं दिव्य challange!!! अर्धा, एक, तीन, पाच मिनिट. आता ताण असह्य, देहाची थरथर… श्वासाची, हृदयाची वाढलेली गती… फुटलेला घाम! थांबलेलं घड्याळ अन् न संपणारं मिनिट… कुठेतरी लागलेली कळ. एखादा क्षण अगदी असह्य… मन ओरडतं, ‘नाही, आता नाही शक्य. बासssssss!!!’

तेवढ्यात समोरून योगशिक्षकाची सूचना येते, “सगळे शरीर सैल, शिथिल सोडा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपण आसनस्थिती नक्की टिकवणार आहोत अगदी सहज” नकळत आपण स्थिर होतो. ताण पचवतो. कळ कमी होते. श्वासाला लय, हृदयाला गती सापडते. परत सूचना येते, “आता आसनस्थिती सोडायची आहे” आपले हात पाय सैल. तत्क्षणाला शरीर, मनाला सुखासनात नेणारा हा अनुभव अवर्णनीय असतो. शरीर हलकं, मन शांत प्रसन्न झालेलं असतं. कसलं तरी एक छोटंस युद्ध जिंकल्याचा आनंद! आपण आता ‘तयार’ झालेलो असतो, दिवसभराच्या युद्धासाठी! शेवटी रोजच्या आयुष्यात येणारे ताणतणावाचे प्रसंग म्हणजे काय? आपणच घेतलेली आसनस्थितीच की तशीच अगदी तशीच शरीर व मनाची अवस्था! जर ‘त्या’ आसनात आपल्याला स्थिर शांत राहता आलं, तर इथे का नाही?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -