नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. चटर्जी यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ईडीने शुक्रवारी रात्री टीएमसी पक्षाचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची मैत्रीण अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान २० कोटींहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने इत्यादी जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच छापेमारीत अनेक गुन्हे दाखले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेले हे पैसे एसएससी घोटाळ्याशी निगडीत असल्याचा संशय ईडीला आहे. कारवाईच्या काही मिनिटांनंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी “ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.. असे म्हणत पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे.
छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आमदार माणिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते.
पश्चिम बंगाल सरकारच्या मंत्र्यांवर करण्यात येत असलेली ही संपूर्ण कारवाई शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. २०१६ मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये नापास उमेदवार लाखो रुपयांची लाच देऊन उत्तीर्ण झाले. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक केली जाईल.