Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

अमरावतीत रेल्वे क्रॉसिंगवर बस बंद पडली, काझीपेठ एक्स्प्रेसचा खोळंबा

अमरावतीत रेल्वे क्रॉसिंगवर बस बंद पडली, काझीपेठ एक्स्प्रेसचा खोळंबा

अमरावती (हिं.स.) : चांदूर रेल्वे शहराबाहेर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर चांदूर रेल्वे आगाराची एसटी बस बंद पडल्यामुळे काझीपेठ सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास २९ मिनिटे उभी राहिली आहे.

अमरावती वरून चांदूर रेल्वेकडे मालखेड मार्गे येणारी चांदूर रेल्वे आगाराची एसटी बस शहराबाहेर रेल्वे क्रॉसिंगवरून येत असतांना ऐन मधातच ट्रॅकवर सदर एसटी बंद पडली. धक्का देऊन बस काढण्याचा प्रयत्न केला असता तरी सदर बस निघाली नाही. त्यामुळे दुसरी एसटी बस बोलाविल्यानंतर दोरीच्या साहाय्याने बांधून ओढण्यात आले. व नंतर एसटी बस निघाली. यानंतर थांबलेली एक्सप्रेस गाडी रवाना करण्यात आली.

या कालावधीत पुणे ते काजीपेठ दरम्यान धावणारी काझीपेठ सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास २९ मिनिटे उभी राहिल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली. या प्रकारामुळे रेल्वे विभागाचे शेड्युल बिघडले असून एसटी महामंडळाला दंड बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकारावरून एसटी महामंडळाने सुद्धा भंगार बसेस न चालविता चांगल्या प्रकारच्या एसटी बसेस रस्त्यांवर चालवायला हव्या असा सूर प्रवाशातून व्यक्त होत आहे.

अनेक भंगार बसेस रस्त्यांवर

अमरावती जिल्ह्यातील आठही बस डेपो मध्ये अनेक भंगार बसेस आहेत त्या सुद्धा रत्यांवर धावत आहेत अश्या बसेसचा केंव्हा ही अपघात होण्याची शक्यता आहे. या बसेस रत्यांवर चालवण्यात येऊ नये अशी मागणी एसटी च्या विविध कामगार संघटनांनी केली आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात एखाद्या वेळेस एस टी चा मोठा अपघात होण्याशी शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment