मुंबई (हिं.स.) : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यभरात सुमारे ८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये वर्धा येथे १.३० लाख हेक्टर आणि नांदेडमध्ये ३ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
राज्यात मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ८ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर सुमारे ४ हजार हेक्टर जमिन खरडली गेली आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नांदेड, हिंगोली, बुलढाण्यात आदी जिल्ह्यांत अतिवृष्टी व त्यानंतर उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांची मोठी नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसला असून, तेथील २ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन व फळपिकांचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यांत १ लाख ३१ हजार तर यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहे.
यासोबतच चंद्रपुरात ५५ हजार हेक्टर, नागपूरमध्ये ३३ हजार हेक्टर, भंडाऱ्यात १९ हजार हेक्टर, गडचिरोलीत १३ हजार हेक्टर, बुलढाण्यात ७ हजार हेक्टर, अकोल्यात ७२ हजार हेक्टर, अमरावतीत २७ हजार हेक्टर, हिंगोलीत १६ हजार हेक्टर, पुणे जिल्ह्यात तीन हजार हेक्टर, धुळे दोन हजार हेक्टर, नाशिक दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहे. नांदेडमध्ये सर्वाधिक १४२९ हेक्टर तर अमरावतीत १२४१ हेक्टर जमीन खरडली गेली आहे. अकोल्यात ४४१ हेक्टर, नागपूरमध्ये ३२१ हेक्टर, अहमदनगरमध्ये १७६ हेक्टर, यवतमाळमध्ये १४२ हेक्टर, पुण्यात १७६ हेक्टर, नंदुरबारमध्ये २७ हेक्टर, ठाण्यात १४ हेक्टर, रायगडमध्ये दोन हेक्टर अशी एकूण सुमारे ४ हजार हेक्टरच्या घरात जमीन खरवडून गेली आहे.