रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोरोना कालावधीत मच्छीमारीत आलेल्या अडथळ्यांमुळे म्हणावी तशी मासेमारी न झाल्याने मत्स्यढ़ साठ्यात झालेली वाढ, समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे माशांचे होणारे स्थलांतर याचा फायदा रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्योत्पादन वाढीला झाला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात ३५ हजार ८५४ मेट्रिक टनाची वाढ झाली आहे. या वर्षात १ लाख १ हजार २२८ मेट्रिक टन उत्पादन मिळाले आहे.
राज्याच्या सांख्यिकी विभागाकडून मत्स्योत्पादनाची आकडेवारी जाहीर केली आहे. राज्याला लाभलेल्या समुद्र किनारी भागांतील पाच जिल्ह्यांमध्ये अव्वल मत्स्योत्पादन मुंबई जिल्ह्यात दोन लाख मेट्रिक टनाहून अधिक आहे. दुसरा क्रमांक रत्नागिरी जिल्ह्याचा लागतो. त्यानंतर ठाणे, रायगड, सिंधुदुर्गचा क्रमांक आहे. सर्वच जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन ६५ हजार ३७४ मेट्रिक टन इतके होते. वर्षभरात त्यात मोठी वाढ झालेली आहे. २०१३-१४ साली जिल्ह्यातील मत्स्योत्पादन १ लाख ६ हजार ८५२ मे. टन होते. त्यानंतर दर वर्षी उत्पादनात घट होत गेली होती. सात वर्षानंतर पुन्हा एक लाखापेक्षा अधिक उत्पादन मिळालेले आहे. जिल्ह्यात मासळी उतरवणारी २७ केंद्र असून त्यातील पाच बंदरे मोठी आहेत. या बंदरामध्ये दर वर्षी उतरवण्यात येणाऱ्या मासळीच्या आकडेवारीवरून मत्स्योत्पादन काढले जाते.
२०१७-१८ मध्ये सागरी मत्स्योत्पादन १८.३८ टक्क्याने, २०१८-१९ मध्ये ८.२२ टक्क्याने, तर २०१९-२० मध्ये १०.२६ टक्क्याने घटले. २०२०-२१ मध्ये मत्स्योत्पादनात १.२१ टक्के घटले होते. मात्र २०२१-२२ मध्ये तुलनेत मोठी वाढ झाल्याने मच्छीमारांसाठी आनंददायी गोष्ट आहे. पर्ससीननेट मासेमारीवर बंदी घातल्यानंतरही पुढे तीन वर्षांच्या काळात मासेमारीत घट होत राहिली. मात्र त्यानंतर प्रथमच झालेली वाढ ही अभ्यासाचा विषय ठरला आहे. पूर्वी अनेक मोठे मच्छीमार जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात राहून मासेमारी करत आले आहेत. मात्र आधुनिक तंत्र किंवा मोठ्या नौकांच्या उभारणीमुळे बारा नॉटिकल मैलाच्या बाहेर जाऊनही मासेमारी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
कोरोना काळात अनेकांना मासेमारीत अडथळे आल्याने सलग दोन वर्षे पाहिजे तशी मासेमारी झाली नाही. त्याचा फायदा प्रजननासाठी झाला आणि त्यामधून जिल्ह्याच्या जलधी क्षेत्रातील मत्स्यसाठे वाढले असावेत असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर समुद्राचे प्रवाह बदलत असल्यामुळे माशांत स्थलांतर होत राहते. त्यामुळे अनेक माशांची संख्याही कमी-अधिक होत असते.