
मुंबई (प्रतिनिधी) : पुढील वर्षापासून उपनगरीय रेल्वेमध्ये ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची अंमलबजावणी होणार असून रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट आदींमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना एकाच तिकीटाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
बेस्ट उपक्रमामध्ये अलीकडेच एकात्मिक तिकीट प्रणालीची प्रायोगित तत्वावर अंमलबजावणी केली असून यासाठी प्रवाशांना कार्डही वाटप करण्यात आले. मात्र रेल्वे, मेट्रो किंवा अन्य परिवहन सेवांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध नसल्याने बेस्टच्या या सेवेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकातही लवकरच एकाच तिकिटावर प्रवास करता येणे शक्य होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एमआरव्हीसीने यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून त्यांचा अहवाल दोन महिन्यांत सादर होणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रियेसाठी साधारण तीन-चार महिने लागतील. दरम्यान निविदा प्रक्रियेअंती कंपनीला या कामाची जबाबदारी दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रणालीची अंमलबजावणी होणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट व इतर सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावे, यासाठी ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची योजना आखण्यात आली होती.
कशी असणार सुविधा?
या योजनेनुसार रेल्वे स्थानकातील सर्व प्रवेशद्वारांवर कार्ड रीडर बसविण्यात येणार आहेत. प्रवास करणाऱ्यांना कार्ड रीडरवर कार्ड टॅप करावे लागेल, केलेल्या प्रवासानुसार कार्डमधून पैसे वजा होतील आणि तिकीट उपलब्ध होईल. तिकिटाची तपासणी करण्यासाठी तिकीट तपासनीसांना उपकरणे देण्यात येतील.