 
                            कोल्हापूर (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी नगरपरिषदेने तृतीयपंथी व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक पद देऊन त्याचा सन्मान केला आहे. अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वीकृत सदस्यपदी तृतीयपंथींना स्वीकारणारी हुपरी ही राज्यात पहिली नगरपरिषद ठरली आहे. या माध्यमातून आजपर्यंत देवआई म्हणून ओळख असणाऱ्या तातोबा बाबूराव हांडे यांना आता नवी ओळख मिळाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात तातोबा हांडे यांच्या रूपाने प्रथमच तृतीय पंथीयास प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान आमदार प्रकाश आवाडे प्रणीत कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीने मिळवून दिला आहे. याआधी विधवा प्रथा बंदीचा क्रांतिकारक निर्णय घेऊन जिल्ह्यातील हेरवाड गावाने राज्यासमोर आदर्श घालून दिला होता. यानंतर असाच आणखी एक ऐतिहासिक निर्णय हुपरी नगरपरिषदेत घेण्यात आला आहे.
ताराराणी आघाडीचे तत्कालीन स्वीकृत नगरसेवक प्रकाश बावचे यांनी पदाचा कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा दिला. त्यामुळे या पदावर निवड होण्यासाठी आज नगरपरिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या. आवाडे गटातर्फे या पदावर आपली निवड व्हावी यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, ताराराणीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी इतर इच्छुकांची नावे बाजूला करत संपूर्ण परिसरात देव आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या तातोबा हांडे यांच्या नावास पसंती दर्शवली.
तातोबा हांडे ऊर्फ देव आई रेणुका भक्त म्हणून ओळखले जातात. परिसरात त्यांचा मोठा भक्तगण आहे. त्यांनी नगरपरिषदेची पहिली निवडणूक ताराराणी आघाडीकडून लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र कागद पत्रातील काही त्रुटींमुळे त्यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला होता. त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी तातोबा हांडे उर्फ देवी आई यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द दिला होता, त्याची आज आवाडे यांनी पूर्तता केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, नगरसेवक सुरज बेडगे, बाळासाहेब रणदिवे, उदय पाटील आदी उपस्थित होते.
आता सन्मान मिळाला - तातोबा हांडे
नगरसेवकपदी निवड झाल्यावर हांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, नगरपालिकेत मिळालेल्या या संधीने आयुष्याचे सोने झाले. आजपर्यंत अनेकांनी हिणवले, झिडकारले पण आता सन्मान मिळाल्याची भावना आहे. तसेच तृतीयपंथी समाजानेही आमचा प्रतिनिधी आता सभागृहात गेल्याने समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तृतीयपंथी समाजाच्या खूप समस्या - राहुल आवाडे
ताराराणी आघाडीचे नेते राहुल आवाडे म्हणाले की, हुपरी नगरपरिषदेवर ताराराणी आघाडीची सत्ता आहे. देशात आदिवासी समाजातील महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केले. तर आम्ही तृतीयपंथी समाजातील व्यक्तीला नगरसेवक पद देऊन त्यांचा त्याच धर्तीवर सन्मान केला आहे. तृतीयपंथी समाजाच्या खूप समस्या आहेत. त्यांना अपमान सहन करून जगावे लागते. जोगवा मागून आपल्या पोटाची खळगी भरतात, त्यामुळे यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हुपरी नगर परिषदेने केला आहे.
आपला समाज आम्हाला स्वीकारत नाही, तृतीयपंथीयाची व्यथा
तृतीयपंथी संतोष धोत्रे म्हणाले की, आम्ही देखील या समाजाचे एक घटक आहोत. तरीदेखील आम्ही तृतीयपंथी असल्याने आपला समाज आम्हाला स्वीकारत नाही. किमान आतातरी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा. इथून पुढे प्रत्येक संस्थांमध्ये अशा पद्धतीने तृतीयपंथी यांना मान दिला, तर त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणणे सोपे होऊन जाईल यात शंका नाही.

 
     
    




