लंडन (वृत्तसंस्था) : भारताचा माजी विस्फोटक फलंदाज सुनील गावस्कर यांच्या खेळीचा जगभर बोलबाला आहे. क्रिकेटमधील त्यांच्या कामगिरीची दखल चक्क इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतली आहे. इंग्लंडच्या लीसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात येणार आहे. युरोप देशातील क्रिकेट स्टेडियमला भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ असेल. शनिवार २३ जुलैला या स्टेडियमचे नामकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला स्वत: सुनील गावस्कर उपस्थित राहणार आहेत.
लीसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावस्कर यांचे नाव देण्याचे सर्व श्रेय इंग्लंडमध्ये दीर्घकाळ भारतीय वंशाचे खासदार असलेल्या कीथ वाझ यांना जाते. कीथ यांनी तब्बल ३२ वर्षांपर्यंत लीसेस्टचे प्रतिनिधित्व केले आहे. कीथ म्हणाले की, “गावस्कर यांनी आम्हाला खेळपट्टी आणि मैदानाला त्यांचे नाव देण्याची परवानगी दिली, याचा आम्हाला अत्यंत सन्मान आणि आनंद वाटतो. गावस्कर एक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घालून जगभरात नाव केले आहे. सुनील गावस्कर फक्त ‘लिटल मास्टर’च नाहीत तर, क्रिकेटमधील ‘ग्रेट मास्टर’ देखील आहेत.”
कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणारे सुनील गावस्कर पहिले क्रिकेटपटू आहेत. तसेच ते दिर्घकाळ सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाजही राहिले आहेत. परंतु, काही काळानंतर मास्टरबास्टर सचिन तेंडुलकर याने सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला होता.