मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोविडनंतर होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष बाब म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. पण २०२३ पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर बंदी आणण्यात येणार आहे. पुढच्या वर्षापासून शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचीच खरेदी आणि विक्री करणे बंधनकारक असणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर ती मूर्ती पीओपीची असल्याचे नमूद करणे आवश्यक आहे. जेणेकरुन विसर्जन व्यवस्थेत असणाऱ्याना प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती ओळखणे सुलभ होईल. या मूर्त्यांचे सार्वजनिक ठिकाणी विसर्जन न करता त्यांचे कृत्रीम तलावात विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.