ऑरेगॉन (वृत्तसंस्था) : नीरज चोप्रापाठोपाठ भालाफेकपटू रोहित यादवनेही वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये यशस्वी कामगिरी केली. पात्रता फेरीत रोहित यादवने पहिल्याच प्रयत्नात ८०.४२ मीटर भालाफेक केली. या कामगिरीसह त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
रोहित यादवने त्याच्या गटात सहावे आणि दोन्ही गटात ११वे स्थान मिळवून १२ जणांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रोहितच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रोहित भारताला पदक मिळवून देईल, अशीही अपेक्षा केली जात आहे.
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा भालेफेकपटू दविंदर सिंह कांगने सर्वात प्रथम अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर नीरज चोप्राने घवघवीत यश मिळवले. त्यानंतर रोहित यादवनेही दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.