Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीकाय चुकलं? नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!

काय चुकलं? नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!

आदित्य ठाकरे यांना आमदार कांदे आणि खासदार गोडसे जाब विचारणार

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांमध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या आदित्य ठाकरे शिवसेना नव्याने बांधण्यासाठी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा करत आहेत. आज आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा आहे. यावेळी एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जात आहोत, तर यामध्ये आमचं काय चुकलं, असे मी आदित्य ठाकरे यांना विचारणार असल्याचे सुहास कांदे यांनी सांगितले. त्यापाठोपाठ खासदार गोडसे यांनीही आदित्य ठाकरे भेचणार असून गरज भासल्यास मातोश्रीवरही जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आज नाशिकमध्ये हायव्होल्टेज राजकीय ड्रामा रंगण्याची शक्यता आहे.

सुहास कांदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. मी आज माझ्या समर्थकांसह आदित्य ठाकरे यांना भेटणार आहे. मी शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांना फोन केला होता. मला आदित्य ठाकरे यांना भेटायचे आहे, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी साहेबांशी बोलून कळवतो, असे सांगितले. मी आता मनमाडला जाण्यासाठी निघालो आहे, असे कांदे यांनी सांगितले. त्यामुळे आता आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सुहास कांदे यांनी अनेक मुद्द्यांवरून आदित्य ठाकरे यांना जाब विचारला आहे. आम्ही आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काहीच बोलणार नाही. मातोश्री हे आमचे पंढरपूर आहे. उद्धवसाहेब हे आमचे विठ्ठल आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. पण मला आदित्य ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा आहे. काल त्यांच्या भाषणावेळी हातामध्ये भगवा धागा दिसत नव्हता. त्यांच्या हातामधले शिवबंधन कुठे गेले? त्यांनी हे प्रतिक सोडले आहे का, असा सवाल सुहास कांदे यांनी उपस्थित केला.

सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना अनेक मुद्द्यांवरून घेरले. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत. नांदगावामध्ये पर्यटन खात्याचा एकतरी प्रकल्प दाखवावा. त्यांनी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर मी ताबडतोब राजीनामा देईन. मी बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक आहे. मी निवडणूक लढून पुन्हा निवडून येईल, असे सुहास कांदे यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -