Thursday, January 16, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखदेवेंद्र लय भारी…...

देवेंद्र लय भारी……

सुकृत खांडेकर

२०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. भाजप-शिवसेना युतीला राज्यात सरकार स्थापन करण्याचा जनतेने कौल दिला होता. भाजपचे १०६ आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असा जनतेचा पक्का विश्वास होता. पण राजकारणात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा सर्वात महत्त्वाचा असतो. शिवसेनेने विचार बदलला. शरद पवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने सत्तेच्या सारीपाटावरील गणिते फिसकटली. २०१४ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या व ५ वर्षे सलग या पदावर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची पाळी आली. विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असून आणि विधानसभेची निवडणूक शिवसेनेबरोबर युती करून लढवूनसुद्धा भाजपला विरोधात बसायची पाळी आली, ही फार मोठी जखम देवेंद्र फडणवीस यांच्या अंत:करणावर झाली.

२०१९ मध्ये मावळत्या विधानसभेची मुदत संपताना, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून निरोपाचे भाषण करताना, मी पुन्हा येईन असे म्हटले होते. निवडणूक प्रचारातही, मी पुन्हा येईन असे म्हटले होते. पण त्यांच्या पुन्हा येईनची विरोधी पक्षांनी टवाळी केली. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप पुन्हा सत्तेवर आला नाही आणि देवेंद्र पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत, ही सल त्यांना सतत बोचत राहिली. पण ते शांत बसले नाहीत. अडीच वर्षे ते पायाला भिंगरी लावल्यासारखे महाराष्ट्रात फिरत राहिले. राज्याचा विरोधी पक्षनेता महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढत होता आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मातोश्री व वर्षावर घरात बसून होते. देवेंद्र फडणवीस कोविड काळात प्रत्येक जिल्ह्यात फिरत होते, औषधोपचार, इस्पितळात डॉक्टर्स, नर्सेस, रेमडिसिविअरर्सची इंजेक्शने उपलब्ध आहेत की नाही, याची चौकशी करीत होते. जिथे उपचार नव्हते किंवा कमी पडत होते, जिथे कोविड सेंटर्समध्ये कमतरता होती, जिथे अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होती अशा प्रश्नांवर ते सतत आवाज उठवत राहिले. आणि महाआघाडीचे नेते मात्र मोदी सरकारच्या थाळ्या वाजवा आणि घंटा वाजवा या कार्यक्रमांची टिंगल करीत होते. अतिवृष्टी किंवा पूर तेथेही गावागावी देवेंद्र गेले. शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसले. मुख्यमंत्रीपद नसले म्हणून काय झाले, थेट लोकांमध्ये जाऊन मिसळणारा व जिथे असंतोष आहे तिथे जाऊन भिडणारा नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची राज्यात प्रतिमा आहे.

महाविकास आघाडीचे सरकार २५ वर्षे राहणार, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असणार अशा घोषणा करण्यात शिवसेनेचे प्रवक्ते मॅटिनी शोज रोज करीत होते. त्याच वेळी देवेंद्र मात्र पक्ष संघटना मजबूत करणे आणि जनतेशी जनसंपर्क वाढवणे यात गुंतले होते. कोविड काळात ठाकरे सरकार सुस्तावलेले होते आणि देवेंद्र अहोरात्र दौरे करीत होते. शिवसेनेतील असंतोष उद्धव ठाकरे यांनी कधी गांभीर्याने घेतलाच नाही. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली तडजोड शिवसेनेच्या आमदार-खासदारांना मान्य नव्हती हे त्यांना समजलेच नाही. भाजप हा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र होता, हे जनतेला समजले. पण उद्धव यांना उमगले नाही. मोदी-शहा यांचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाल्यानंतर शिवसैनिकांची मानसिकता काय आहे व जनतेच्या अपेक्षा काय आहेत, हे उद्धव यांनी जाणून घेतले नाही. त्याचा राजकीय लाभ देवेंद्र यांनी पक्षासाठी घेतला, तर त्यांचे चुकले असे कसे म्हणता येईल?

अडीच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना त्यांनी ठाकरे सरकारला एक दिवस शांतपणे झोपून दिले नाही. सुशांत सिंग आत्महत्या, दिशा सॅलियनचा गूढ मृत्यू, मुकेश अंबानी यांच्या मलबार हिलवरील अँटेलिया निवासस्थानासमोर उभी राहिलेली स्फोटकांची मोटार, सचिन वाझेची संशयास्पद भूमिका, मनसुख हिरेन या उद्योजकाची झालेली हत्या, अर्णव गोस्वामी यांच्यावर झालेली पोलीस कारवाई अशा एक ना एक प्रकरणात त्यांनी महाआघाडीचे वस्त्रहरण केले. महाआघाडीचे दोन मंत्री आजही जेलमध्ये आहेत. एका मंत्र्याला राजीनामा देणे भाग पडले. ठाकरे सरकार बुडाले पण जेलमध्ये असलेल्या नबाब मलिक यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्याची हिम्मत शेवटपर्यंत झाली नाही. मुंबई पोलिसांकरवी महिना शंभर कोटींच्या खंडणीच्या वसुलीवरून देवेंद्र यांनी महाआघाडीला धारेवर धरले होते. नेमणुका व बदल्यांमध्ये झालेला अमाप भ्रष्टाचार देवेंद्र यांनीच उघड केला. तरीही आम्ही १७२ आहोत, अशा गमजा शिवसेनेचे प्रवक्ते मारीत होते. केवळ कोविडमुळेच महाआघाडीला दोन वर्षे अभय मिळाले, अन्यथा अगोदरच देवेंद्र फडणवीसांच्या तोफांपुढे हे राम म्हणायची पाळी आली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा देवेंद्र यांच्यावर वरदहस्त आहे.

देवेंद्र म्हणजे महाराष्ट्र भाजप असे समीकरण आहे. देवेंद्र हा प्रदेश भाजपचा देशपातळीवरील चेहरा आहे. केवळ मोदी-शहांच्या आशीर्वादामुळेच नव्हे, तर देवेंद्र यांची कार्यपद्धती, अथक परिश्रम, अफाट दौरे, अचाट जनसंपर्क आणि त्यातून भाजपचा होत असलेला विस्तार, पक्षाला मिळत असलेले यश यातून देवेंद्र महाराष्ट्रात केंद्रस्थानी आले आहेत. राज्यात काँग्रेसची मक्तेदारी होती, तेव्हा यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांचे राजकारणावर वर्चस्व होते. पण त्या सर्वांना मागे सारून देवेंद्र यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. सत्तेच्या पदावर नसतानाही शिवसेनाप्रमुखांचे स्थान हे राज्य व राष्ट्रीय पातळीवर अढळ होते. पण सत्तेच्या परिघात राहून सत्ता स्थानांवरील दिग्गजांना बाजूला सारून नंबर १ स्थान प्राप्त करण्याची किमया देवेंद्र यांनी करून दाखवली आहे.शिवसेनेत फूट पडली. पन्नास आमदार सेनेपासून दूर गेले. ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर भाजप व शिंदे गटाने सरकार स्थापनेचा दावा केला, तेव्हा देवेंद्रच मुख्यमंत्री होणार अशी सर्वसामान्य जनतेनेही अटकळ बांधली होती. आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असे जाहीर करून देवेंद्र यांनी महाराष्ट्राला पहिला शॉक दिला. नव्या सरकारला आपला संपू्र्ण पाठिंबा राहील. पण आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे सांगून दुसरा शॉक दिला. पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेला नेता दुसऱ्याच्या हाताखाली काय म्हणून काम करील, असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात आला.

सत्तेच्या राजकारणात कमीपणा घेऊन खालच्या पदावर काम करणे ही फार मोठी शिक्षा असू शकते. पण नवे सरकार टिकवायचे आहे, नवे सरकार स्थिर ठेवायचे आहे, सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद द्यायचे आहे हा भाजप श्रेष्ठींनी विचार केला. मोदी, शहा आणि नड्डा यांनी देवेंद्र यांच्याशी संपर्क साधलाच. पण ट्वीट करून नव्या सरकारमध्ये देवेंद्र उपमुख्यमंत्री असतील, असे जाहीर करून टाकले. पक्ष मोठा आहे आणि अशा वेळी पक्षावर निष्ठा दाखविण्याची हीच संधी असते, असा देवेंद्र यांनी विचार केला. आपण पक्षामुळे आहोत, हे देवेंद्र कसे विसरू शकतील? देवेंद्र यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. या संस्कारात मीपणा नसतो. त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल ते कधीच शब्दांत बोलून दाखवणार नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला देणे व त्यांच्या हाताखाली काम करणे अशी मनाची तयारी करणे, ही काही सोपी गोष्ट नाही. पण निष्ठा महत्त्वाची हे देवेंद्र यांनी सर्व देशाला दाखवून दिले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘प्रहार’मध्ये त्यांच्या हार-प्रहार स्तंभात देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेल्या निष्ठेचे कौतुक केले होते. नव्या सरकारमध्ये केंद्र व राज्य सरकार यांच्यातील प्रमुख दुवा म्हणून देवेंद्र यांना कामगिरी बजावायची आहे. एकनाथ शिंदे गट व भाजप असे सरकार सत्तेवर असले तरी आम्ही म्हणजेच शिवसेना असा दावा शिंदे गटाने केला आहे. सत्ता गेली तरी उद्धव ठाकरे हे भाजपशी जमवून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पण त्यांचा यापुढे बराचसा वेळ पक्ष वाचविण्यासाठी जाणार आहे. शिंदे गट-भाजप सरकार एकसंध ठेवण्याची जबाबदारी देवेंद्र यांच्यावर आहे. ते महत्त्वाकांक्षी आहेत, पण दिल्लीने दिलेला अजेंडा त्यांना पूर्ण करायचा आहे. देवेंद्र यांना वाढदिवसानिमित्त प्रहार परिवाराच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा.

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -