सुभाष म्हात्रे
अलिबाग : अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात १ जून ते १२ जुलै दरम्यान ३१२ गावांच्या हद्दीतील ६६० शेतकऱ्यांचे प्राथमिक नजर अंदाजानुसार १०५.१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, जिल्ह्यात २० जुलैपर्यंत ७० टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पेण तालुक्यातील ९७ गावांतील ३५१ शेतकऱ्यांचे ५२.९५ हेक्टर भात व भाजीपाला क्षेत्र बाधित झालेले असून,१.५० हेक्टर क्षेत्रात गाळ घुसला आहे. माणगाव तालुक्यातील २०६ गावांतील १६० शेतकऱ्यांचे २८.४० हेक्टर भातपीक क्षेत्र बाधित झाले आहे. रोहा तालुक्यातील एका शेतकऱ्याचे ०.६० भातपीक हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. महाड तालुक्यातील एका गावातील दहा शेतकऱ्यांचे २.५० हेक्टर बाधित झाले असून, पैकी ०.१५ हेक्टर क्षेत्रात रेजगा घुसला आहे.
पोलादपूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे ०.०७ हेक्टर भातपीक क्षेत्र बाधीत झाले आहे. कर्जत तालुक्यातील पाच गावांच्या हद्दीतील १३४ शेतकऱ्यांची १९.८० हेक्टर भातपीक क्षेत्र बाधित झाले आहे. सुधागड तालुक्यातील पाली हद्दीतील तीन शेतकऱ्यांचे ०.८० हेक्टरवरील भातपीक बाधित झाले आहे, असे एकूण १ जून ते १२ जुलै दरम्यान ३१२ गावांच्या हद्दीतील ६६० शेतकऱ्यांचे प्राथमिक नजर अंदाजानुसार १०५.१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
नुकसानभरपाई कधी मिळणार? : शेतकरी चिंताग्रस्त
खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात १०१०११.७६ हेक्टर क्षेत्र भातपिकाखालील असून, पैकी ६६७५२.३८ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. २६९१.८ क्षेत्र नाचणीखालील असून, पैकी ८५०.४१ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. १४२१.६६ हेक्टरक्षेत्र इतर तृणधान्याखालील असून, पैकी १५१.७५ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. कडधान्यापैकी सरासरी १२५४.४ हेक्टर क्षेत्र तूर पिकाखालील असून, पैकी २२६.१२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. २५ हेक्टर क्षेत्रावर मूगपिकाची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. १५.२ हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. सध्या पावसाने उघडिप घेतल्याने भातपीक लावणीच्या कामांना जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र काही ठिकाणचे पीक क्षेत्रासह काही जमिनी बाधित झाल्याने तेथील शेतकरी मात्र चिंताग्रस्त असून, सरकारकडून नुकसानभरपाई कधी मिळणार, या अपेक्षेत आहेत.