मुंबई : अल्पवयीन मुली, कॉलेज तरुणी आणि महिलांचे फोटो डाऊनलोड करून, ते मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडीओ संबंधित तरुणींना मोबाईलवर पाठवून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करणा-या एका विकृताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत त्याने ६०० हून अधिक महिलांना अशाप्रकारे ब्लॅकमेल केल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. तसेच त्याने काही महिलांचे फोनही हॅक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका कॉलेज तरुणीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर तब्बल ५ महिन्यांनी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
मुंबईतल्या धारावी परिसरात राहणारा आरोपी रवी दांडू (वय ३०) हा डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून एका कंपनीत काम करतो. तो सोशल मीडियावरुन सुंदर मुलींचे फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड करुन, मॉर्फ करुन त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार करायचा. व त्याद्वारे तो या महिलांकडे शरीरसुखाची मागणी करायचा. काही मुलींचे फोन हॅक करुन त्यांची बदनामी करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विले पारले येथील कॉलेजमधील १७ वर्षीय तरुणीला रवीने अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तिचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिच्या ३५ मित्र मैत्रिणींना पाठवून रवीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र ही बाब मुलीने घरातल्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार २० फेब्रूवारी २०२२ मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्याकडे १० मोबाईल आणि वेगवेगळे १२ सीम कार्ड होते. त्याद्वारे तो या महिलांच्या संपर्कात होता. नुकतेच त्याने या तरुणीला फोन करुन बुधवारी भेटायला बोलवले. यानंतर अंधेरी पोलिसांनी आलेल्या कॉलचा मोबाईल पत्ता ट्रेस करुन रवी दांडूवर गुन्हा दाखल करत, त्याला त्याच्या सायन येथील घरातून अटक केली.
नुकतेच रवीने ब्लॅकमेलिंगची पद्धत बदलली होती. विद्यार्थिनींना तो कॉलेजचा प्रोफेसर आहे आणि अभ्यासाच्या सामग्रीची देवाणघेवाण करण्याच्या बहाण्याने व्हॉटसअॅप ग्रूपला अॅड व्हायला सांगायचा. त्यासाठी तो एक लिंक बनवून मुलींना पाठवायचा. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यावर येणारा ओटीपी शेअर करायला सांगून तो ओटीपी मिळताच मुलीच्या संपूर्ण मोबाईलचा ताबा तो स्वत:जवळ ठेवायचा.
या मुली, कॉलेज तरुणी आणि महिलांशी संपर्क करण्यासाठी तो बँकेतील सेव्हींग्ज अकाउंटवरील माहिती डाटा एन्ट्री करताना घेऊन मोबाईल क्रमांक मिळवत असे. त्यानंतर सोशल मीडियावरील विविध अॅपचा वापर करुन त्याचे हे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर सुरु होते. त्याला शोधून काढण्यासाठी पोलिसांना तब्बल ५ महिने कसून तपास करावा लागला.