मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात येणाऱ्या खड्ड्यांना बुजवण्यासाठी पालिकेने तीन वर्षांत सव्वातीन हजार मेट्रिक टन कोल्डमिक्सचा वापर केला आहे. मात्र तरीही मुंबईतील खड्ड्यांची समस्या कायम आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी विविध प्रयोग केल्यानंतर अखेर २०१९ मध्ये पालिकेने कोल्डमिक्सचा वापर सुरू केला.
मुंबई महापालिकेने कोल्डमिक्सच्या निर्मितीसाठी वरळीमध्ये कोल्डमिक्सचा प्रकल्प उभारला. येथे कोल्डमिक्स तयार करून ते सर्व विभाग कार्यालयांना पुरवले जाते. गेल्या तीन वर्षांत सव्वातीन हजार मेट्रिक टन कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन पालिकेने यंदा २२४४.५ मेट्रिक टन (८९७८० बॅग) कोल्डमिक्सचे उत्पादन केले. गरजेनुसार त्यातील २१५४.२५ मेट्रिक टन (८६१७० बॅग) कोल्डमिक्सचे वाटप विभाग कार्यालयांना करण्यात आले आहे.
सध्या पालिकेकडे ९०.२५ मेट्रिक टन (३६१० बॅग) कोल्डमिक्स शिल्लक आहे. तसेच यंदा मुंबईतील एकूण ४२७.२७ चौरस मीटर जागेवरील खड्डे भरल्याचा दावा पालिकेने केला आहे. यासाठी एकूण २९.२२५ मेट्रिक टन म्हणजेच ११६९ बॅग कोल्डमिक्स वापरण्यात आले आहे. पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर २७९ खड्डे झाले असल्याचे म्हटले आहे. त्यातील २६१ खड्डे भरण्यात आले आहेत.