मुंबई : मुंबईमध्ये इन्फ्लूएन्झा एच१एन१ ची लागण झालेले किमान चार रुग्ण लाईफ सपोर्टवर आहेत. शहरात पुन्हा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
पावसाळा सुरू झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. मुंबईतील पावसामुळे आणि बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सर्दी, ताप, मलेरिया यांसारख्या आजारांसह आता स्वाईन फ्लूचा प्रसार होत आहे.
देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. असे असताना आता कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये काही रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांना आता सावध राहण्याची गरज आहे.
मुंबईमध्ये इन्फ्लूएन्झा एच१एन१ ची लागण झालेले किमान चार रुग्ण लाईफ सपोर्टवर आहेत. शहरात पुन्हा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ज्या लोकांची कोविड -१९ चाचणी निगेटिव्ह येत आहे, त्यांनी एच1एन1 चाचणी करावी, असे आवाहन नागरिकांना डॉक्टरांकडून वारंवार केले जात आहे.
जुलैमध्ये इन्फ्लूएंझा एच१एन१ च्या ११ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर जूनमध्ये दोन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच, ओपीडीमध्ये दररोज स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या किमान दोन ते तीन रुग्णांची नोंद केली जात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
कोरोनाप्रमाणेच एच१एन१ हादेखील श्वसनासंबंधातील आजार आहे. स्वाईन फ्ल्यूचाही कोरोनाप्रमाणेच २०१९ मध्ये जागतिक महामारी म्हणून प्रादुर्भाव दिसून आला होता. पण कालांतराने त्याचा प्रादुर्भाव कमी झाला.
गेल्या आठवड्यात राज्यात एच१एन१ मुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १० जुलै रोजी पालघरच्या तलासरी येथील ९ वर्षीय मुलीचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे झाल्याची घटना समोर आली आहे.
शहरात, गेल्या तीन वर्षांत एच१एन१ च्या एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नव्हती. तर यापूर्वी २०२० मध्ये ४४ आणि २०२१ मध्ये ६४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यामुळे लोकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या तुलनेत स्वाईन फ्लूवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, लक्षणे म्हणजे ताप, नाक गळणे, अंगदुखी, वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण आहे.
गंभीर लक्षणे असलेल्यांनी कोविड आहे असे समजून थांबू नये. तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वाईन फ्लूमुळे प्रशासनाच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.